पुणे; पुढारी वृत्तसेवा : जीवनात अनेक वेळा अपयशानंतरही पुन्हा नव्या जोमाने उभे राहणे यालाच यशस्वी होणे, असे म्हणता येईल. जिंकणे आणि हारणे या दोन्ही गोष्टींनी मिळून जीवन बनते. आजच्या मुलांना जिंकण्याबरोबरच हारणेसुद्धा किती महत्त्वाचे आहे, हे समजावून सांगणे काळाची गरज आहे, असे मत प्रेरक वक्ता शिव खेरा यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वात एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ बिजनेसतर्फे आयोजित कार्यक्रमात व्यवस्थापन विभागातील 120 प्राध्यापकांना व्यवस्थापन संदर्भात शिव खेरा यांनी विशेष मार्गदर्शन केले. त्यानिमित्ताने शिव खेरा यांनी पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला.
या प्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र-कुलगुरू डॉ. तपन पांडा, स्कूल ऑफ बिजनेसचे अधिष्ठाता डॉ. दीपेंद्र शर्मा, स्कूल ऑफ इकॉनॉमी अॅण्ड कॉमर्सच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. अंजली साने उपस्थित होत्या. शिव खेरा म्हणाले, की हारल्यामुळे मुले डिप्रेशनमध्ये जातात. अशा वेळेस सकारात्मक दृष्टीने त्यांना जिंकण्यासाठी हारणे किती महत्त्वाचे आहे, हे आई-वडिलांनी समजावून सांगावे. यशस्वीतेसाठी जिंकण्याची सवय अंगीकारावी. त्यासाठी सतत सकारात्मक व्यवहाराला आपली सवय बनवा.
एक समान शिक्षणप्रणाली हवी
आजच्या शिक्षण पद्धतीवर शिव खेरा म्हणाले, की देशातील सर्व मुलांना एक समान संधी मिळेल. या देशातील एनआरआय व्यक्ती प्रचंड हुशार असून, ते यशस्वी झाले आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्याबरोबर त्यांची संस्कारित अर्धांगिणी जी सुख व दुःखात त्यांच्यासोबत असते. त्याच जोरावर व्यक्ती यशस्वीतेची पायरी चढत असतो.