पुणे; पुढारी वृत्तसेवा: आजच्या मुलांना कायमच मोबाईल व इंटरनेट गेमचे वेड लागलेले असते. असाच एक आठवीतील मुलगा ऑनलाईन रम्मीत घरच्यांचे पैसे हरला. अन् घरच्यांसाठी ते पैसे कमवून परत देण्यासाठी घरात न सांगताच पळून गेला. मात्र, रेल्वे पोलिसांच्या तो नजरेस आला. त्याला तत्काळ ताब्यात घेत कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ऑनलाईन रम्मीत पैसे हरल्याने घरातील ओरडतील. त्यामुळे घरच्यांचे पैसे परत करावे, यासाठी घरातून निघून एकटाच मुंबईला निघालेल्या एका 15 वर्षीय मुलाला आरपीएफच्या (रेल्वे सुरक्षा बल) अधिकार्यांनी पुणे रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याला विचारपूस केली असता, त्याने स्वत:ची माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्याला साथी रेल्वे चाईल्ड लाईनकडे सोपविले. चाईल्ड लाईनच्या वतीने या मुलाचे समुपदेशन करण्यात आले.
यात त्याला चांगली, वाईट गोष्ट काय आहे, याचे महत्त्व पटवून दिल्यानंतर त्या मुलाने स्वत:ची आणि कुटुंबीयांबद्दल माहिती दिली. घरच्यांचा मोबाईल नंबर दिला. त्यानंतर संस्थेच्या वतीने मुलाच्या घरच्यांशी संपर्क साधण्यात आला. कुटुंबीय आल्यावर बाल कल्याण समितीसमोर सर्वांना उभे करून मुलाला कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले, असे चाईल्ड लाईनचे राजवीर सिंग यांनी दै.'पुढारी'शी बोलताना सांगितले.
मुलांनी टोकाचे पाऊल उचलू नये…
ऑनलाईनरीत्या सट्टेबाजी, रम्मी, जुगार खेळून अनेक मुले घरातील कुटुंबीयांचे लाखो रुपये उडवत आहेत. या वेळी घडलेली घटना घरच्यांना सांगण्याऐवजी ते विविध मार्गांनी सोडविण्याचा प्रयत्न करतात. यात त्यांच्या जीवितालादेखील धोका होण्याची
शक्यता असते. मात्र, असे झाल्यास मुलांनी कोणतेही चुकीचे पाऊल न उचलता थेट घरातील कुटुंबीयांना याबाबत सांगावे आणि माफी मागावी, असा सल्ला तज्ज्ञ सल्लागारांनी दिला आहे.
पाच महिन्यांत 267 मुले सापडली
एप्रिल 2022 ते ऑगस्ट 2022 या 5 महिन्यांच्या कालावधीत पुण्यासह विविध राज्यांतून घरातून पळून आलेली 267 मुले सापडली आहेत. त्यांना आरपीएफ आणि साथी रेल्वे चाईल्ड लाईनने सुखरूप त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविले आहे. यात 213 मुले आणि 54 मुली होत्या, असेही राजवीर सिंग यांनी सांगितले.