पुणे

लोणावळा परिसरात धुवाधार; 24 तासांत 220 मिलिमीटर पावसाची नोंद

अमृता चौगुले

लोणावळा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मागील दोन दिवसांपासून लोणावळा शहर आणि परिसरात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरूच असून मंगळवारी सकाळपासून बुधवारी सकाळपर्यंत 24 तासात 220 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. सोमवार सकाळ ते बुधवार सकाळ या 48 तासांत एकूण 432 मिलिमीटर पाऊस लोणावळा शहरात पडला आहे. बुधवारीदेखील दिवसभर संततधार सुरूच होती, तर अधूनमधून जोरदार सरी संपूर्ण परिसरात पडत होत्या.

लोणावळा परिसरात असलेल्या घाटमाथ्यावर पडत असलेल्या पावसामुळे घाटाखाली खोपोली परिसरातील पाताळगंगा नदीला पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, कर्जतमधून वाहणारी उल्हास नदीदेखील दुथडी भरून वाहू लागली आहे. लोणावळा परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील धबधबे खळाळून वाहू लागले आहेत. पर्यटनस्थळ असलेल्या लोणावळा परिसरातील निसर्ग खुलला असून, पर्यटकांचीही गर्दी होत आहे.

परिसरातील धरणे भरण्याच्या मार्गावर

गेल्या आठवड्यात मागील वर्षीच्या तुलनेत निम्म्याने मागे पडलेल्या पावसाने तो फरक आता भरून काढायला सुरुवात केली असून, बुधवार (ता.19) सकाळअखेर यावर्षीचा एकूण पाऊस 1744 मिलिमीटर इतका नोंदवण्यात आला आहे. मागील वर्षी या तारखेपर्यंत 2592 मिलिमीटर पाऊस नोंदवण्यात आला होता. मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शहरातील टाटा कंपनीचे लोणावळा धरण 50 टक्क्यांहून अधिक भरले असून, लोणावळा नगर परिषदेचे तुंगार्ली धरण साठवण क्षमतेएवढे भरले असून अधिकचे पाणी टाटा कंपनीच्या वलवण धरणाकडे वाहू लागले आहे. भुशी धरण यापूर्वीच ओव्हरफ्लो झाले असून, यातून लोणावळा धरणाकडे विसर्ग वाढला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT