पुणे

LokSabha Elections | महायुतीच्या सुनेत्रा पवार यांना लोकसभेत पाठवा; हर्षवर्धन पाटील

Laxman Dhenge

बावडा : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील शेतीला भाटघर व खडकवासल्याचे पाणी अपुरे पडत आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून हजारो कोटींच्या निधीतून इंदापूर तालुक्याला वाढीव पाणी मिळण्यासाठी नवीन योजना हाती घेतली जाणार आहे. त्यामुळे शेतीचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी व तालुक्यात विकासकामांचे नवीन पर्व सुरू करण्यासाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना लोकसभेत पाठवा, असे आवाहन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे मंगळवारी (दि.23) केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट, भाजप, शिवसेना व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेत हर्षवर्धन पाटील यांनी भरपावसात भाषण केले. ते पुढे म्हणाले, भीमा नदीवर तीन ठिकाणी बुडीत बंधारे बांधण्याची नियोजन आहे. तसेच निरा नदीवरील बंधार्‍यांमध्ये वर्षभर पाणीसाठा राहावा असा आमचा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेतृत्वाचा आपल्यावर मोठा विश्वास असल्याने निवडणुकीनंतर विकासकामांना निधी अजिबात कमी पडणार नाही. आपले व अजित पवार यांच्यातील मतभेद संपले असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, मनोज पाटील यांचे भाषण झाले. सभेस जिल्हा भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष तानाजी थोरात, तालुकाध्यक्ष अ‍ॅड.शरद जामदार व भाजपचे व विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन कालिदास आवाड, तर आभार किरण पाटील यांनी मानले.

भाजप नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवा

भाजपने बारामती लोकसभेची निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. भाजपच्या केंद्रीय व राज्य नेतृत्वाचा आपल्यावर कायम विश्वास राहिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आपणास सहकार्य करीत आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यातून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मताधिक्य देऊन हा विश्वास सार्थ ठरवावा, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT