पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी, महायुती आणि वंचित बहुजन आघाडीने उमेदवार जाहीर केल्यानंतर आता एमआयएमनेही महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अनिस सुंडके यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे पुणे लोकसभेची निवडणूक चौरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे लोकसभेसाठी भाजप महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली असून, काँग्रेस महाविकास आघाडीने कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे.
कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरायचेच, असा निश्चय केलेल्या वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली. त्यामुळे ही निवडणुक तिरंगी होणार, असा कयास बांधला जात असतानाच, एमआयएमने स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अनिस सुंडके यांना उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे पुण्याची लोकसभा निवडणूक चौरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या पंचवीस वर्षांपासून मी पुण्यातील राजकारणात सक्रिय आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मी गेल्या अनेक निवडणुकांमध्ये काम केले आहे. स्थायी समिती अध्यक्ष असताना पुण्यासाठी अनेक विधायक कामे केली आहेत. पूर्ण ताकदीने निवडणूक लढणार आहे.
– अनिस सुंडके, उमेदवार, एमआयएम
हेही वाचा