पुणे : पुढारी वृत्तसेवा : महायुतीमध्ये असूनही आम्हाला राज्यात मंत्रिपद देण्यात आलेले नाही. लोकसभेच्या दोन जागा आम्ही मागितल्या आहेत. मात्र, साधे चर्चेलाही बोलाविले जात नाही. त्यामुळे महायुतीमध्ये आम्ही नाराज आहोत. पुढील दोन- तीन दिवसांत पुढील भूमिका ठरविणार आहोत, असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक शहरात गुरुवारी (दि.28) झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. या वेळी पक्षाचे शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.
आठवले म्हणाले, राज्यात आयोजित करण्यात येत असलेल्या सरकारच्या शासकीय कार्यक्रमात माझे कुठेही छायाचित्र लावले जात नाही. आमच्या कार्यकर्त्यांना कुठेही विश्वासात घेतले जात नाही. सोलापूरच्या जागेसाठी आम्ही आग्रही होतो. मात्र, भाजपने उमेदवार जाहीर केला. मला महाविकास आघाडीची ऑफर होती, पण मी नाकारली, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
आठवले म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आरपीआय पक्षाला योग्य असा सन्मान मिळाला पाहिजे. आरपीआय पक्षाचे एक शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. मनसेबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. मनसे अजून महायुतीमध्ये आलेली नाही. शिर्डी लोकसभेची जागा अजून निश्चित झालेली नाही. मी मंत्री असल्यामुळे शिर्डी मतदारसंघाचा विकास केला.
हेही वाचा