पुणे

पुणे : स्थानिकांना आजपासून खेड शिवापूर येथे टोल

अमृता चौगुले

खेड शिवापूर : पुढारी वृत्तसेवा :  सन 2020 पासून वादाचा विषय ठरलेल्या खेड शिवापूर टोल नाका प्रशासनाने किंबहुना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्थानिक वाहनांना यापुढे टोल आकारला जाईल, असा निर्णय घेतला आहे. बुधवारपासून (दि. 1) आता स्थानिकांना टोल द्यावा लागणार असल्याने स्थानिक नागरिकांसह शिवगंगा खोर्‍यातील नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. दि. 16 फेब—ुवारी 2020 रोजी झालेल्या आंदोलनात खेड शिवापूर टोल नाका हा भोर हद्दीच्या अथवा पीएमआरडीएच्या हद्दीबाहेर हलवावा, असे पत्रक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देण्यात आले होते.

मात्र, त्या वेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एमएच 12 व एमएच 14 तसेच स्थानिक वाहनांना तोपर्यंत टोलमाफी करण्यात येईल, असे पत्र दिले होते. परंतु, आता टोल नाका पीएमआरडीएच्या हद्दीबाहेर हलविण्याचा विषय बाजूला ठेवून स्थानिकांना वेठीस धरण्याचे काम सुरू केले आहे. या सर्व कारभारामुळे शिवगंगा खोर्‍यात संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. खेड शिवापूर टोल नाका हटाव कृती समितीचे निमंत्रक माऊली दारवटकर म्हणाले, 'राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एम. एच. 12 व एम. एच. 14 तर सोडाच स्थानिकांनासुद्धा टोल आकारण्यात येईल, असा पवित्रा घेतला आहे, त्यामुळे आम्ही आता अंतिम लढाई लढणार आहे.'

अनेकवेळा आम्ही स्थानिक वाहनचालकांना व वाहनमालकांना विनंती केलेली आहे की, आपण फक्त 315 रुपयांचा महिन्याचा पास काढा आणि एका दिवसात तुम्ही कितीही वेळा टोल पास करून जा. मात्र, अजूनही काही स्थानिकांनी टोलचा पास काढलेला नाही. त्यामुळे यापुढे स्थानिकांना टोल आकारावा लागणार असल्याचे टोल नाका व्यवस्थापक अमित भाटिया यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT