अवैध मासेमारीला लगाम घालणारे अधिकारीच ‘बेलगाम’; स्थानिक मच्छीमारांचा तीव्र आंदोलनाचा इशारा Pudhari
पुणे

अवैध मासेमारीला लगाम घालणारे अधिकारीच ‘बेलगाम’; स्थानिक मच्छीमारांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

संतापलेल्या मच्छीमारांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

पुढारी वृत्तसेवा

पळसदेव: उजनी जलाशयातील मत्स्यबीजांचे सरंक्षण करण्यासाठी आणि बेकायदेशीर मासेमारीला लगाम घालण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने नेमलेल्या समितीचे काही अधिकारी मिळणार्‍या चिरीमिरीपुढे बेलगाम झाले आहेत. त्यामुळे उजनीतील बेकायदेशीर मासेमारीला ऊत आला आहे. यामुळे संतापलेल्या मच्छीमारांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

गेली 28 वर्षे उजनी जलाशयात मत्स्यबीज सोडले गेले नसल्याने आणि बेकायदेशीर मासेमारीला लगाम नसल्याने उजनीतील मासेमारी व्यवसाय पूर्णतः रसातळाला गेला होता. विविध प्रकारचे गावरान व अन्य मासे नामशेष झाल्यात जमा आहेत.

उजनी जलाशयात मत्स्यबीज सोडावे म्हणून शासनस्तरावर येथील मच्छीमारांनी सातत्याने मागणी करून पाठपुरावा केल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून उजनी जलाशयात शासन स्तरावरून कोट्यवधी रुपयांचे मत्स्यबीज सोडण्यात आले. यामुळे उजनीतील मासेमारी व्यवसायाला खर्‍या अर्थाने नवसंजीवनी प्राप्त झाली व सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळाले, याचा आनंद सर्वांच्या चेर्‍यावर ओसंडून वाहत होता.

उजनीत मत्स्यबीज सोडल्यानंतर माशांचे संगोपन करण्याची जबाबदारीही प्रशासनाची आणि मच्छीमारांची होती. यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून समिती नेमण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी कार्यकारी अभियंता, उजनी धरण व्यवस्थापक भीमानगर, सदस्य म्हणून सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, तर सदस्यपदी तहसीलदार अशा सहा महत्त्वाच्या खात्यांची त्या त्या तालुक्यानुसार नियुक्ती करून कारवाईसाठी समिती तयार केली होती.

परंतु, कागदावर नेमलेली ही समिती कागदावरच राहिली. वरवर कारवाई करण्याचा फार्स दाखवून आतल्या हाताने चिरीमिरी घेऊन परराज्यांतील मच्छीमार व बेकायदेशीर मासेमारी करण्यार्‍यांनाच आतल्या हाताने ताकद दिली जात आहे.

समितीच्या अधिकार्‍यांकडून वादावादी घडविण्याचा प्रयत्न

स्थानिक मच्छीमार व त्यांचे प्रतिनिधी जिवाचे रान करून बेकायदेशीर मासेमारीला आळा घालण्यासाठी प्रशासनाला वस्तुस्थिती सांगून सहकार्य करीत होते. मात्र, यातील काही अधिकार्‍यांनी आमचे काही ऐकले नाही.

उलट मच्छीमार प्रतिनिधींचा फोन येत असल्यामुळे आम्ही कारवाईसाठी आलो असल्याचे समितीमधील अधिकारी जाणीवपूर्वक परप्रांतीय मच्छीमारांना व त्यांना मासेमारीसाठी आणणार्‍या गावगुंडाना सांगतात. या माध्यमातून स्थानिक पातळीवर वादावादी घडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप स्थानिक मच्छीमारांनी केला आहे.

रक्षकच बनले भक्षक

यामुळे उजनीतील बेकायदेशीर मासेमारीला लगाम लावण्यासाठी नेमलेले रक्षकच आज भक्षक बनल्याचे दिसून आल्याने येथील मच्छीमार व मच्छीमार प्रतिनिधी कमालीचे संतप्त झाले असून, कोणत्याही क्षणी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मच्छीमार प्रतिनिधी अनिल नगरे, बलभीम चबरे, युवराज नगरे, पोपट नगरे यांनी या वेळी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT