पुणे

न्हावरा रस्त्यावरील ढाब्यांवर दारू विक्री; राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांचे दुर्लक्ष

अमृता चौगुले

तळेगाव ढमढेरे; पुढारी वृत्तसेवा : तळेगाव ढमढेरे- न्हावरा रस्त्यावर अनेक हॉटेल, ढाबे आहेत. या ठिकाणी गावठी दारू मिळत आहे. त्याचप्रमाणे विदेशी दारूही विनापरवाना विक्री होत आहे. यावर महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) परिसरात डझनभर हॉटेल आणि ढाबे आहेत. यातील काही ठिकाणी परवाना नसताना राजरोसपणे गावठी आणि विदेशी दारू विक्री होत आहे.

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. दूषित दारूमुळे तळीरामांचे जीव गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. दारू पिऊन घरी भांडणे करणे, मुलाबाळांना मारहाण करणे, याचबरोबर घरात कोणत्याही प्रकारचा हातभार नाही, असे वर्तन दारू पिणारे करत असल्याने अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. मुलांचे शिक्षण आणि घरगाडा एकट्या महिलेला ओढावा लागत आहे.

शासनाने दारू बंदी केली असताना शाळा, विद्यालय, महाविद्यालयात परिसरात दारू विक्री मोठ्या प्रमाणात चालू आहे. विद्यार्थी शाळेत शिक्षण घेण्यासाठी जात असताना सकाळपासून संध्याकाळपर्यंत तळीराम वेगवेगळ्या स्थितीत विद्यार्थ्यांना पाहायला मिळतात. या भागातील काही तरुणही व्यसनाधीन झाले आहेत.

बंदी असताना एवढ्या धाडसाने दारू विक्रेत्यांना नक्की कोणाचा वरदहस्त याची चर्चा जोरात सुरू आहे. तळेगाव शिक्रापूर रोडपासून न्हावरा रस्त्यावर ढाबे आणि हॉटेलची संख्या 12च्या वर आहे. यामध्ये बार परवानाधारक बोटावर मोजता येतील इतकेच आहेत. बाकीचे ढाबे आणि हॉटेलचालक सर्रासपणे दारू विकत आहेत. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

SCROLL FOR NEXT