भवानीनगर(ता. इंदापुर) पुढारी वृत्तसेवा : युरियाबरोबर कंपनीने लिंकिंग केलेली खते घ्यावी लागत असल्यामुळे दुकानदारांबरोबरच शेतकरी हैराण झाले आहेत. शेतकर्यांना लिंकिंग खतांचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
शेतकर्यांना शेतीमालाचे उत्पादन घेत असताना युरिया खताची सर्वांत जास्त आवश्यकता भासते. परंतु, युरिया खताबरोबर कंपन्या इतर खते घेण्याची दुकानदारांवर सक्ती करीत आहेत.
ती खते घेतली तरच दुकानदारांना युरिया खत मिळेल, असे कंपन्यांकडून सांगितले जात आहे. युरिया खताचे उत्पादन घेत असताना सरकार कंपन्यांना अनुदान देते, तरीही युरिया खताबरोबर इतर खते घेण्यासाठी कंपन्या दुकानदारांवर दबाव आणत आहेत. युरिया खताबरोबर लिंकिंग केलेली इतर खते घेण्यासाठी शेतकरी तयार होत नाहीत. त्यामुळे युरियाबरोबर लिंकिंग केलेली इतर खते खपविण्यासाठी दुकानदारांसमोर मोठा प्रश्न निर्माण होत आहे.
शेतकरी शेतीमालाचे उत्पादन घेताना अनेक प्रकारची खते वापरून जास्तीत जास्त व दर्जेदार उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीत असतो. सोबतच कंपनीने देखील अतिरिक्त खते शेतकर्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करू नये. शेतकर्यांनी युरिया खताबरोबर लिंकिंग केलेली इतर खते घेतली तर शेतीमालाचा उत्पादन खर्च वाढून शेतकर्यांना भुर्दंड सोसावा लागत आहे. कंपन्यांकडून लिंकिंग केलेली इतर खते घेण्यासाठी सक्ती केली जात असल्यामुळे दुकानदारांमध्ये देखील नाराजीचा सूर निर्माण झाला आहे.
शेतीमालाच्या उत्पादनासाठी युरिया खताची आवश्यकता असते. शेतकर्यांकडून या खताला जास्त मागणी असते. त्यामुळे नफा कमविण्यासाठी कंपन्या युरियाबरोबर इतर खतांचे लिंकिंग करून शेतकर्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न करतात. कृषी विभागाने अशा कंपन्यांवर कारवाई केली पाहिजे.
हनुमंत वीर, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना