पुणे : पुढारी वृत्तसेवा : खडकवासला ते इंदापूरपर्यंत वाहत असलेल्या नवीन उजवा मुठा कालव्याच्या शहरी भागात अजूनही 40 टक्के पाणीगळती होत आहे. ही गळती रोखण्यासाठी अस्तरीकरण आणि मजबुतीकरणाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी 37 कोटींचा निधी मंजूर आहे; मात्र हा कालवा कायमच वाहता असल्यामुळे त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात अडचणी येत आहेत.
खडकवाला धरणापासून ते इंदापूरपर्यंत 202 किलोमीटरचा नवीन मुठा उजवा कालवा आहे. या कालव्याचे काम सन 1960 रोजी पूर्ण झाले. त्यास 63 वर्षे पूर्ण झाली आहेत.
खडकवासला ते फुरसुंगीपर्यंत 29 किलोमीटर लांब हा कालवा आहे. शहरातील धायरी, नांदेड, जनता वसाहत, पुणे कॅम्प, हडपसर या भागांसह पुढे फुरसुंगी, लोणी काळभोर या भागांतून पुढे दौंड आणि शेवटी इंदापूरला पोहोचतो. या कालव्याची एक हजार क्युसेस वहन क्षमता आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या कालव्यात राडारोडा वारंवार टाकण्यात येत आहे. तसेच, भराव 'लूज' झाले आहेत. त्याचप्रमाणे कालव्याखालून पाण्याची सुमारे 40 टक्के गळती होत असल्यामुळे टेलला म्हणजेच इंदापूरपर्यंत केवळ 100 क्युसेस पाणी पोहोचत आहे. अनेक वर्षांपासून या कालव्याची दुरुस्ती, अस्तरीकरण, तसेच मजबुतीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे कालव्यास भेगा पडल्या आहेत.
या भेगांमध्ये उंदीर, घुशी यांनी राहण्यासाठी जागा केली. परिणामी, कालव्यास पाणी सोडल्यानंतर या छिद्रामध्ये पाणी जात आहे. त्यामुळे गळती होणे प्रसंगी मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून कालवा फुटणे, अशा घटना वारंवार होत आहेत. त्यातच या कालव्यातून कायमच खालच्या भागासाठी पाणी सुरू राहिल्यामुळे या कालव्यात ओलावा असतो. त्यामुळे भरावाचे काम केले, तरी खालच्या भागात ओलावा असल्याने किती काळी माती अगर मजबुतीकरणासाठी इतर प्रक्रिया वापरल्या, तरी जोपर्यंत संबंधित भाग दुरुस्तीनंतर चांगला सुकत नाही, तोपर्यंत संबंधित भागातील गळती थांबणे अवघड आहे. कालवा चांगला सुकल्यानंतरच खर्या अर्थाने दुरुस्ती, अस्तरीकरण किंवा मजबुतीकरण करता येते.
याबाबत माहिती देताना खडकवासला साखळी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील म्हणाले, 'कालव्याच्या भरावाची कामे पूर्ण होत आली आहेत. फुरसुंगी (देशमुख मळा), तसेच खडकवासला, धायरी, जनता वसाहत ते शिंदेवस्तीपर्यंत भागापर्यंत कालव्याच्या
दुरुस्तीची कामे सुरू करावयाची आहेत. मात्र, कायम कालवा सुरू असल्यामुळे ही कामे करण्यात अडचणी येत आहेत. या कामासाठी सुमारे 37 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर, फुरसुंगीपासून पुढे कालव्याची कामे सुरू असून, त्यासाठी 63 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.'