वेल्हे; पुढारी वृत्तसेवा : पानशेत धरण खोर्यातील रायगड जिल्ह्यालगतच्या अतिदुर्गम टेकपोळे, खाणू व वाड्या-वस्त्यांमध्ये लम्पी व इतर आजारांची लागण झालेल्या गायी, बैल, वासरे अशा जनावरांना जीवदान देण्यात वेल्हे तालुका पशुवैद्यकीय विभागाला यश आले आहे.
मपानशेत धरणखोर्यात लम्पीने जनावरांचा मृत्यूफ असे वृत्त दै. मपुढारीफमध्ये प्रसिद्ध होताच वेल्हे तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. भास्कर धुमाळ यांच्या देखरेखीखाली पशुवैद्यकीय पथकाने या दुर्गम भागात धाव घेतली.
आजारी जनावरांची तपासणी केली असता काही जनावरांना लम्पीची लागण झाल्याचे तसेच काही जनावरांत इतर आजारांची लक्षणे दिसून आली. लसीकरण मोहीम राबवूनही अनेक जनावरे या लसीकरणापासून वंचित होती. अखेर डिगेवस्ती, खाणू, टेकपोळे टाकीवस्ती आदी ठिकाणी गायी, बैल, वासरे अशा 126 जनावरांचे लम्पी प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. आजारी जनावरांना जंतुनाशक गोळ्या, शक्तिवर्धक औषधे देण्यात आली. पशुवैद्यकीय विभागाचे डॉ. एस. एस. खोरे, डॉ. बी. एल. सोरटे, अंकुश पायगुडे आदी कर्मचार्यांनी दोन दिवस पायपीट करीत लसीकरण मोहीम राबवली.
उंच डोंगरमाथ्यावर जाऊन लसीकरण
जनावरांचे लसीकरण करण्याचे मोठे आव्हान उभे होते. मात्र, लम्पीची लागण होऊन एकापाठोपाठ एक अशी जनावरे मृत्युमुखी पडत असल्याने पशुवैद्यकीय विभागाने प्राणाची बाजी लावली. पशुधन वाचविण्यासाठी झिंगू ढेबे, म्हाळू कचरे, सखाराम भोड आदी शेतकरी पशुवैद्यकीय विभागाच्या मदतीला आले. जनावरे रानात न सोडता त्यांनी लसीकरण करून घेतले.
पानशेत खोर्यात गेल्या चार महिन्यांपासून वेळोवेळी लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. मात्र, दुर्गम भागात जनावरे रानात सोडण्यात येत असल्याने या जनावरांचे लसीकरण झाले नाही. आतापर्यंत तालुक्यातील 11 हजारांहून अधिक गायी, बैल, वासरे अशा जनावरांचे लम्पी प्रतिबंधक लसीकरण केले आहे. दुर्गम भागात लम्पीग्रस्त जनावरे आढळल्याने आवश्यक खबरदारी घ्यावी.
– डॉ. भास्कर धुमाळ,
पशुधन विकास अधिकारी, वेल्हे