पुणे : राज्यात गेल्या काही महिन्यात वारंवार छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या बाबत बदनामी करताना दिसून येते. शासनाने राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अजय भोसले आणि प्रशांत कुंजीर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेतो. राष्ट्रमाता जिजाऊंच्या नावाने ’जय जिजाऊ’ असे अभिवादन करतो. मात्र प्रशांत कोरटकर सारख्या विकृत व्यक्ती आजही या थोर व्यक्तींबद्दल नीच आणि बेताल वक्तव्ये करतो ही शोकांतिका आहे. या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो. महापुरुषांची बदनामी करणार्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणी ही भोसले यांनी यावेळी केली.
प्रशांत कोरटकर या व्यक्तीने कोल्हापूरचे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना केलेल्या मोबाईल कॉलच्या रेकॉर्डिंगमध्ये त्याने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्याबद्दल अत्यंत गलिच्छ, विकृत आणि संतापजनक वक्तव्ये केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामध्ये त्याने जेम्स लेनच्या विकृत लिखाणाला समर्थन देऊन समस्त शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केल्याचे कुंजीर यांनी सांगितले.
प्रशांत कोरटकरने राज्यात ब्राह्मणाची सत्ता आहे असे म्हणत मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन इंद्रजीत सार्वत यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. चिथावणी देऊन दोन समाजात वाद लावण्याचा प्रयत्न केला आहे. कोट्यावधी लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. मात्र राज्याचे मुख्यमंत्री या विकृत माणसाला संरक्षण देत आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून राज्यभर या विकृत प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हे नोंदवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच सरकार आणि पोलिस प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने न हाताळल्यास संभाजी ब्रिगेडकडून भविष्यात आक्रमक आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात गेल्या काही महिन्यात पुन्हा एकदा शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन वातावरण बिघडवत आहेत. राज्यात साडे तीन टक्के असणार्या लोकांनी असे वक्तव्य करून नंतर आम्ही बोललोच नाही असे करत आहेत. त्यांचा हा दुर्गुण आम्ही ठेचणार, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अजय भोसले यांनी दिला.
प्रशांत कोरटकर यांना पकडून त्याची जाहीर धिंड काढणार्याला संभाजी ब्रिगेडच्या वतीने एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. त्याच बरोबर त्याला पकडून काळे फासण्यात येईल.