पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात आयुष्यमान योजनेच्या लाभासाठी चार लाख 7 हजार 28 कुटुंबे पात्र आहेत. योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत दोन लाख 41 हजार 221 जणांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील 27 टक्के लाभार्थ्यांनाच ई-कार्ड वाटप करण्यात आले आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींवर मोफत उपचार केले जातात. महात्मा फुले जनआरोग्य अभियानात तीन लाखांपर्यंतचे तर त्यावरील खर्चाचे उपचार आयुष्यमान भारत योजनेतून केले जातात. जिल्ह्यातील एकूण 67 रुग्णालये असून, त्यात 18 शासकीय तर 49 खासगी रुग्णालयांमध्ये 950 आजारांवर उपचार केले जात आहेत. आयुष्यमान योजनेतील ई-कार्ड वाटपाचे काम संथ गतीने सुरू असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
पुणे ग्रामीण क्षेत्रातील 1 लाख 79 हजार 395 कुटुंबे तर शहरी भागातील 2 लाख 44 हजार 633 असे एकूण चार लाख 57 हजार 28 कुटुंबे आणि त्यातील 11 लाख 73 हजार 835 व्यक्ती योजनेसाठी पात्र आहेत. 23 सप्टेंबर 2018 रोजी आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ झाला. लाभार्थ्यांची कार्ड नोंदणी करण्याची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली.
कोण आहेत पात्र ?
एका खोलीत
कच्च्या घरात राहणारी व्यक्ती
घरात स्त्री ही
कुटुंबप्रमुख असलेले कुटुंब
दिव्यांग कुटुंबप्रमुख
असलेले कुटुंब
अनुसूचित जाती व जमातीमधील कुटुंब
भूमिहीन मजुरांचे कुुटुंब
कार्ड वाटपाची गती वाढविण्याची गरज
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना 2018 मध्ये सुरू झाली. मात्र, प्रशासन पात्र लाभार्थ्यांपर्यंतच पोहोचत नसल्याचे दिसून येत आहे. एकूण लाभार्थ्यांपैकी केवळ 27 टक्के लाभार्थ्यांनाच कार्डचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे कार्ड वाटपाला गती देण्याची गरज आहे.