पुणे

परवाना एक, मात्र उद्योग दुसराच; तळवडे एमआयडीसीतील बाब

Laxman Dhenge

पिंपरी : तळवडे एमआयडीसीतील अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांनी एका उद्योगाचा परवाना घेतला असला, तरी त्यासोबत अनेक व्यवसाय विनापरवाना सुरू केले आहेत. या अवैधरित्या चालणार्‍या उद्योगांकडे महापालिका, एमआयडीसी आणि पोलिस प्रशासन डोळेझाक करीत आहे. त्यामुळे अशा उद्योगांना अभय मिळत आहे. तळवडे येथे फायर कँडल बनविणारा धोकादायक कारखानाही असाच बेकायदा सुरू होता.

परिणामी 8 डिसेंबर रोजी स्फोट होऊन आगीची दुर्घटना घडली. यामध्ये सोळा कामगारांना आगीच्या झळा सोसाव्या लागल्या. काहींचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर काहींना आयुष्यभराचा त्रास सहन करावा लागणार आहे; परंतु अशा बेकायदा व्यवसायांना आळा कधी बसणार? संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे अशाच निष्पाप कामगारांचे बळी जाणार का, असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. तळवडे एमआयडीसीमध्ये या बेकायदा व्यवसायांबाबत दैनिक 'पुढारी'ने पाहणी केली. त्यादरम्यान काही ठिकाणी असा प्रकार सुरू असल्याचे दिसून आले.

निगडी – तळवडे रस्ता

निगडी-तळवडे रोडवरील गणेशनगर येथील एका बेकरीशेजारी असलेल्या गॅस कटिंगचा उद्योग असणार्‍या कारखान्यातच किराणा मालाचे साहित्य भरून ठेवले आहे. यामध्ये तेलाचे डबे, गहू, तांदूळ आदी अन्नधान्याचा मोठा साठा निदर्शनास आला. याबाबत परवाना एका व्यवसायाचा, तर त्यासोबत दुसराच व्यवसाय सुरू आहे.

रूपीनगर-गणेशनगर

येथील रहिवासी भागातील छोट्या-मोठ्या शॉपमध्ये अवैधरित्या अ‍ॅसिडची विक्री होत आहे. हा व्यवसाय रहिवासी भागात करणे बेकायदा आहे. दिवसाढवळ्या खुलेआम अ‍ॅसिडचे बॅरल रस्त्यावर ठेवण्यात येतात. या परिसरात वास्तव्य करणार्‍या रहिवाशांना येथून ये-जा करताना घातक अशा अ‍ॅसिडच्या वासाचा सामना करावा लागत आहे. नाका-तोंडाला रूमाल लावूनच नागरिक येथून ये-जा करत आहेत. बर्‍याच वर्षापासून सुरू असलेल्या या व्यवसायांवर मात्र अद्यापही कारवाई होताना दिसून येत नाही.

तळवडे एमआयडीसीमध्ये सर्रासपणे धोकादायक व्यवसाय सुरू आहेत. कारखान्यात एकासोबत अनेक व्यवसाय सुरू आहे. त्यावर कारवाई होत नसल्याने अशा व्यावसायिकांना आणखी बळ मिळत आहे. शासनाने निदान आगीच्या दुर्घटनेनंतर तरी जागी व्हायला हवे.

– संजय चव्हाण

हेही वाचा

SCROLL FOR NEXT