वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील क्रशर व्यावसायिकांकडून जीवाला धोका असल्याने पोलीस सरंक्षण वाढविण्याची मागणी माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी केली आहे, तर क्रशर व्यावसायिक हे भूमिपुत्र आहेत, गुन्हेगार नाहीत. त्यामुळे भेगडे यांच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे स्पष्टीकरण आमदार सुनील शेळके यांनी केले आहे.
माजी राज्यमंत्री भेगडे यांनी पुणे जिल्ह्यातील गौण खनिज व्यावसायिक अवैध उत्खनन करीत आहेत, या विरोधात हरित लवादात केस दाखल केल्याने या लोकांपासून धोका उत्पन्न होण्याची भीती भेगडे यांनी व्यक्त केली असून क्रशर व्यावसायिकांकडून माझ्या जीवाला धोका असल्याने सुरक्षा वाढवावी अशी लेखी मागणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडे नुकतीच केली आहे.
यासंदर्भात आमदार शेळके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून क्रशर व्यावसायिक शासकीय अटी शर्तीनुसारच व नियमांच्या अधीन राहूनच व्यवसाय करीत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून 10 वर्षे कार्यरत असताना भेगडे यांना कोणीही शासकीय नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसले नाही.
आता मात्र राज्यातील झालेल्या सत्तांतरानंतर अचानक हे व्यावसायिक अवैधरित्या व्यवसाय करीत असल्याचा दृष्टांत भेगडे यांना कसा झाला? केवळ प्रसिद्धीसाठी हा खटाटोप नाही ना? असा सवाल आमदार शेळके यांनी केला आहे. दरम्यान क्रशर व्यवसायिक हे भूमिपुत्र आहेत, गुन्हेगार नाहीत, त्यामुळे त्यांच्याबद्दल माफिया शब्द वापरणे योग्य नाही असेही शेळके यांनी म्हटले आहे.
तसेच क्रशर व्यवसायिक हे शासकीय नियम पळून व्यवसाय करतात, त्यामुळे भेगडे यांच्या जीवाला त्यांच्यापासून कुठलाही धोका असणार नाही व त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. त्यामुळे भेगडे यांनी असा पत्रव्यवहार करून क्रशर व्यावसायिकांची बदनामी करू नये असेही म्हटले आहे.