रांजणगाव गणपती; पुढारी वृत्तसेवा: उद्योगाला चालना देण्यासाठी उद्योजकांसोबत केंद्र सरकार नेहमी चर्चा करत असते. आम्ही देखील काही प्रस्ताव मांडणार असून उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सीएसआर फंड असतो, त्याचादेखील उपयोग कंपन्यांनी योग्य करावा. येणार्या काळात केंद्र सरकार आणि उद्योजक एकत्र मिळून काम करू, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांनी रांजणगाव औद्योगिक वसाहतीत उद्योजकांसोबत झालेल्या बैठकीत केले आहे.
या वेळी बोलताना रेणुका सिंह यांनी सांगितले की, रांजणगाव एमआयडीसी परिसरात उद्योगाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळाला आहे. उद्योग आणि उद्योगपतींना अनेक समस्या आहेत, ज्यांचे समाधान सरकारकडून होत असते. 2022 मध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना औद्योगिक, शेती आणि युवक यांना घेऊन जाणार आहे. 2027 मध्ये भारताला स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होतील तेव्हा भारत एक पूर्ण विशेष राष्ट्र व्हावे, अशी अपेक्षा आहे. आज भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आली आहे.
शेती, औद्योगिक व युवकांना रोजगार याबाबत सरकारची इच्छाशक्ती व पैशांची कमतरता नसल्याचे रेणुका सिंह म्हणाल्या. औद्योगिक क्षेत्राबाबत बोलताना रेणुका सिंह यांनी सांगितले की, देशात आयात कमी व निर्यात जास्त व्हावी अशी भावना आहे. संरक्षण खात्यात भारताने नाव कमावले आहे. 20 ते 22 टक्के संरक्षण खात्यातील उपकरणे भारत निर्यात करत आहे. तसेच कोरोना काळात झालेल्या जाणीवाची त्यांनी खंत व्यक्त केली की, आपण पीपीई किट व व्हेंटिलेटर तयार करू शकलो नाही; मात्र भारतात डॉक्टर, इंजिनिअर व बौद्धिक क्षमतेचे लोक आहेत की, त्यांच्यामुळे या छोट्या-छोट्या व्यावसायिक गोष्टींचा प्रारंभ झाला.
त्यामुळे भारताला याचा मोठा फायदा आला आहे. यावेळी वेळ थोडा कमी आहे, मात्र नोव्हेंबर महिन्यात आल्यानंतर सर्वात प्रथम याच ठिकाणी येऊन सविस्तर चर्चा करू, असे आश्वासन त्यांनी दिले. केंद्रीय मंत्री आणि रांजणगाव इंडस्ट्रीअल असोसिएशनसोबत झालेल्या बैठकीत औद्योगिक क्षेत्रात काही समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे पत्राद्वारे असोसिएशनने मांडले आहे.
तसेच माजी अध्यक्ष राकेश बवेजा यांनी अडचणी मांडताना सांगितले की, ऊर्जा आणि पाणी या दोन मोठ्या समस्या आहेत, त्याचबरोबर माथाडी ही देखील मोठी समस्या आहे. सद्या रस्त्याची सर्वात मोठी समस्या आहे. महिलांना रोजगार देण्याची आमची इच्छा आहे, पण महिला येथे येत नाहीत, कारण इथे सुविधा मिळत नाही.
आम्हाला सर्वात मोठी समस्या ही रस्त्याच्या वाहतुकीची आहे, परंतु आपण यावर जर लक्ष घातले तर ते पूर्ण होईल. याठिकाणी रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि हेलिपॅडसारख्या सुविधा उपलब्ध व्हाव्या अशी आमची अपेक्षा असल्याचे बवेजा यांनी सांगितले. या वेळी भाजप आमदार माधुरी मिसाळ, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, सतीश पाचंगे, विक्रम पाचूंदकर, गणेश ताठे, हर्षद जाधव, रवी चौधरी उपस्थित होते.