पौड रोड(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात 100 मीटरच्या आत तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला बंदी आहे. मात्र, या नियमाचे उल्लंघन करून पौड रोड भागातील शाळा व महाविद्यालयाच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची सर्रासपणे विक्री सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. महाविद्यालयांतील विद्यार्थी व विद्यार्थिनींसह शाळकरी मुले धूम्रपानाच्या आहारी जात आहेत.
महाविद्यालये व शाळेच्या प्रवेशद्वारांवरच विद्यार्थ्यांना धूम्रपानाचे 'धडे' मिळत असून, याकडे एफडीए, तसेच पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पालकांसह नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. तंबाखूमुळे होणारा कर्करोग व त्यातून होणारे मृत्यू टाळण्यासाठी केंद्र सरकारने 'सिगारेट व तंबाखूजन्य नियंत्रण कायदा : 2013' तयार केला. राज्य सरकारने या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी 2015 मध्ये आदेश काढला होता.
या आदेशानुसार शाळा, महाविद्यालय परिसरात तंबाखूविरहित वातावरण तयार करण्याची जबाबदारी शैक्षणिक संस्थांवर टाकण्यात आली आहे. शाळा व महाविद्यालयाच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, सिगारेट ओढणे व या पदार्थांच्या विक्रीवर प्रतिबंध करण्यात आला आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामांसह व्यसनमुक्तीविषयक जनजागृतीचे फलकही शाळा व महाविद्यालयाच्या परिसरात लावणे आवश्यक आहे.
पौड रोड परिसरातील शाळा व महाविद्यालय प्रशासनांचे या कायद्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे शैक्षणिक संस्थांच्या परिसरात असणार्या टपर्या, हॉटेल आणि उद्यानांच्या परिसरात विद्यार्थी धूम्रपान करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. मात्र, या परिसरात कारवाई होत नाही. यामुळे शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात धूम्रपान वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याचे विद्यार्थ्यांमध्ये धूम्रपान करण्याचे प्रमाण वाढले आहे. या गैरप्रकारबाबत स्थानिक नागरिकांनी त्यांना हटकले, तर ते उद्धटपणे उत्तरे देतात. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम करणार्या या गोष्टींना अटकाव करणे गरजेचे आहे.
-हर्षवर्धन मानकर, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड विधानसभा मतदारसंघ
विद्यार्थी व्यसनापासून दूर राहण्यासाठी शाळा प्रशासनाकडून शक्य तितके प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु, आम्हाला शाळेबाहेर काहीच करता येत नाही. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
– विनायक सावंत,
मुख्याध्यापक, शंकरराव मोरे विद्यालय
पौड रोड भागातील शाळा व महाविद्यालयांच्या परिसरातील टपर्या, हॉटेलबाहेर धूम्रपान करणार्यांवर नियमितपणे कारवाई केली जात आहे.
– हेमंत पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोथरूड पोलिस ठाणे
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.