हिरा सरवदे
पुणे : मुलांना लहानपणापासून वाहतुकीचे नियम पाळण्याची सवय लागावी, यासाठी महापालिकेने साकारलेल्या चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कला (वाहतूक उद्यान) विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पार्क सुरू केल्यानंतर तीन महिन्यांत तब्बल 3 हजार 695 विद्यार्थी, 274 शिक्षक आणि 156 पालकांनी भेट देऊन वाहतुकीच्या नियमांचे पाठ गिरवले आहेत.
वाहतुकीचे विविध नियम काय आहेत, नियमांची चिन्हे, त्या चिन्हांचा उपयोग, अर्थ काय, अशा विविध प्रश्नांची उत्तरे लहान मुलांना होण्यासाठी महापालिकेच्या पथ विभागाने औंध येथील ब्रेमेन चौकात ट्रॅफिक पार्क साकारले आहे. लहान मुलांना सोप्या पद्धतीने नियम कळतील, अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.
यामध्ये पहिल्या भागात, पहिल्या टप्प्यात रस्त्यावरील दुहेरी मार्गिका, सायकल मार्ग, पार्किंग व्यवस्था, चौक, स्वतंत्र सिग्नल, पादचारी क्रॉसिंग, तर दुसर्या भागात वाहतूक सुरक्षेसंदर्भातील माहिती चिन्हे, मराठी-इंग्रजीमध्ये माहिती, वाहतुकीसंबंधी 2 ते 3 मिनिटांचा माहितीपट आदींचा समावेश आहे.
दरम्यान, हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यापासून सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यांत 4 हजार 125 जणांनी भेट दिली आहे. यामध्ये महापालिकेच्या 20, खासगी 11 आणि शासनाच्या 1 अशा 32 शाळांच्या
3 हजार 695 विद्यार्थी, 274 शिक्षक आणि 156 विद्यार्थ्यांच्या पालकांचा समावेश आहे.
पार्कमध्ये काय काय आहे?
4 मीटर रुंद आणि 160 मीटर लांबी रस्त्याची प्रतिकृती
रस्त्याच्या प्रतिकृतीमध्ये दुहेरी मार्गिका
पार्किंग व्यवस्था
तीन-चार रस्ते मिळणारे चौक
सिग्नल यंत्रणा
स्वतंत्र सिग्नल यंत्रणेसह सुरक्षित पादचारी क्रॉसिंग
वाहतूकविषयक चिन्हांचे फलक
सुरक्षेसंबंधी व माहितीच्या चिन्हांची उमट रेखीव पद्धतीने
सर्व चिन्हांची मराठी व इंग्रजी भाषेमध्ये फलकांवर अर्थासह माहिती
विविध रंगांच्या वाहन नंबर प्लेट
वाहतूक चिन्हांचे फलक, विद्युत खांब, सिग्नल याची हुबेहूब प्रतिकृती.
वाहन परवाना समजावा यासाठी 4 फुटी प्रतिकृती.
मुलांसाठी चार प्रकारच्या सायकली व हेल्मेट.
दिव्यांगांनाही करता खास सुविधा.
आकर्षक बैठक व्यवस्था.
मुलांना वाहतुकीच्या नियमांचे आकलन सोप्या पद्धतीने व्हावे, यासाठी या ठिकाणी लहान सायकली, हेल्मेटची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी लहान मुले आणि त्यांच्याबरोबर आलेले पालक किंवा शिक्षक यांनाही वाहतूक नियमनाची माहिती देण्यात येते. यामध्ये सेफ किड्स संस्थेचे चांगले सहकार्य मिळत आहे. या प्रकल्पास कमी कालावधीत चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-दिनकर गोजारे, कार्यकारी अभियंता,
पथ विभाग महापालिका