पुणे

लेप्टोस्पायरोसिस आजार ठरू शकतो जीवघेणा

अमृता चौगुले

दीपेश सुराणा : 

पिंपरी : पावसाळ्यात विविध साथीच्या रोगांची लागण होते. त्यामध्ये लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा देखील समावेश आहे. या आजाराकडे वेळीच लक्ष न दिल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो. हा आजार गंभीर वळणावर पोहचल्यानंतर किडनी, यकृत निकामी होणे, फुप्फुसात रक्तस्राव, मेंदूच्या आवरणाला सूज येऊ शकते. 25 ते 44 वयोगटात या आजाराचा संसर्ग होणार्‍या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे निरीक्षण तज्ज्ञ डॉक्टरांनी मांडले आहे. पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयांमध्ये या आजाराचे तुरळक रुग्ण आढळत आहेत.

पावसाळा सुरू झाला की अनेक साथीच्या रोगांची लागण सुरू होते. त्यात आपण डासांपासून होणार्या डेंगू ,मलेरिया यासारख्या आजारांबाबत जागरूक असतो. मात्र, लेप्टोस्पायरोसिस या आजाराबाबत असलेला माहितीचा अभाव आणि जागरुकतेचे कमी प्रमाण यामुळे या आजारापासून बचावासाठी आवश्यक काळजी घेण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

लेप्टोस्पायरोसिसची लक्षणे
लेप्टोस्पायरिया या जिवाणूच्या संसर्गापासून हा आजार होतो. या आजारामध्ये तीव्र ताप, थंडी, डोकेदुखी, अंगदुखी, अंगावर पुरळ येणे, पोटदुखी, हगवण अशी प्रमुख लक्षणे आढळून येतात. या आजाराची लक्षणे 5 दिवस ते 4 आठवड्यापर्यंत दिसू लागतात. रक्ताची चाचणी करुन या आजाराचे निदान केले जाते. हा आजार विशेषतः पावसाळ्यात होतो.

काय काळजी घ्याल?
रस्त्यावर साचलेल्या पाण्यातुन अनवाणी फिरु नये. शक्यतो चालणे टाळावे.
हातापायांना जखमा झाल्या असतील त्यावर मलमपट्टी करणे गरजेचे आहे.
पायामध्ये वॉटरप्रूफ शूज वापरावेत. हात-पाय स्वच्छ धुवावे.
पाळीव प्राण्यांच्या संपर्कात येताना याबाबत विशेष काळजी घ्यायला हवी.

SCROLL FOR NEXT