पुणे

इंदापूर तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढला; नागरिकांमध्ये घबराट

अमृता चौगुले

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : जुन्नर, खेड, आंबेगाव आणि शिरूर या तालुक्यांपाठोपाठ आता बिबट्याने आपला मोर्चा दौंड तसेच इंदापूर तालुक्यांत वळविला आहे. त्यामुळे परिसरात बिबट्यांची दहशत पसरली आहे. वन विभागाने याबाबत उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांसह व प्राणिमित्रांकडून केली जात आहे.

दौंड, इंदापूर भागामध्ये यापूर्वी बिबट्यांचा वावर नव्हता. पण, गेल्या काही दिवसांपासून इंदापूर तालुक्यातील उजनी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. ऊसशेतामुळे त्यांचा वावर वाढला असण्याची शक्यता आहे. बिबट्या दिसल्याच्या तक्रारी गावकर्‍यांकडून येत आहेत. त्यातच सोमवारी (दि. 3) मध्यरात्री पळसदेव हद्दीतील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत चार ते पाच वर्षे वयाचा नर बिबट्या ठार झाला.

यापूर्वी 17 मार्च रोजी दौंड तालुक्यातील यवत येथे नाईकबागेसमोर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरच नर बिबट्याही वाहनाच्या धडकेत मृत्युमुखी पडला. दीड महिन्यात दोन बिबटे मृत पावल्याने या भागात बिबट्यांचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, बिबट्यांमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. उसाला पाणी देण्यासाठी शेतकरी दिवसा देखील घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. शाळकरी मुलांनीही बिबट्याचा धसका घेतला आहे.

दुसरीकडे, अन्न-पाण्याच्या शोधात बिबटे मानवी वस्तींकडे फिरकू लागले आहेत. अशावेळी महामार्ग ओलांडताना वाहनांच्या धडकेत त्यांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे वन विभागाने बिबट्यांना पकडून त्यांच्या मूळ अधिवासात सोडणे, बिबट्याबाबत जनजागृती आदी उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

SCROLL FOR NEXT