पुणे

सिंहगड खोर्‍यात बिबट्याची दहशत; शेतकर्‍यांसमोर वासराचा फडशा

अमृता चौगुले

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : सिंहगड किल्ल्याच्या परिसरात पुन्हा बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे. गुरुवारी (दि. 5) भरदुपारी एक वाजेच्या सुमारास गडाच्या पायथ्याला डोणजे येथील चव्हाणवाडी (ता. हवेली) येथे शेतकर्‍यांसमोरच एका धष्टपुष्ट बिबट्याने वासराचा फडशा पाडला. बिबट्याच्या तावडीतून वासराची सुटका करण्यासाठी शेतकर्‍यांनी जोरदार आरडाओरडा करूनही बिबट्याने वासराला सोडले नाही. बिबट्याचा उग्र अवतार पाहून शेतकर्‍यांनी प्रसंगधानता दाखवत बाजूला धाव घेतली.

त्यामुळे मनुष्यहानी टळली. बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वासराने काही क्षणातच तडफडून प्राण सोडला. सोमनाथ चव्हाण यांनी शेतात चरण्यासाठी गाय बांधली होती. तिचे वासरू शेजारी चरत होते. त्या वेळी जंगलातून आलेल्या बिबट्याने वासरावर हल्ला केला. त्यामुळे गायीने जोरदार हंबर्डा फोडला. तेथे असलेल्या स्वप्निल चव्हाण, वसंत चव्हाण, सोमनाथ चव्हाण यांनी तेथे धाव घेतली असता बिबट्या वासराचा फडशा पाडत होता. बिबट्या शेतकर्‍यांकडे पाहत गुरगुरत होता.

त्या वेळी शेजारील शेतात नंदा कुंडलिक चव्हाण गहू मशागत करीत होत्या. शेतकर्‍यांनी आरडाओरडा करूनही बिबट्या जागचा हलला नाही. वासराचे रक्त पिऊन तो गुरगुरत जंगलात पसार झाला. डोणजे, चव्हाणवाडी, गोळेवाडी तसेच गडाच्या परिसरात नागरी वस्त्या वाढल्या आहेत. शेती, जनावरांचे गोठे आहेत. शेतकरी, गुराखी तसेच पर्यटकांचीही वर्दळ सुरू आहे. त्यामुळे वन विभागाने नागरिकांसाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.

वन विभागाच्या वन परिमंडलाधिकारी वैशाली हाडवळे, सिंहगड वन विभागाचे अधिकारी बाबासाहेब लटके, बाळासाहेब जिवडे, कल्पना सकपाळ यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. वनपरिमंडलाधिकारी हाडवळे म्हणाल्या की, बिबट्याचा शोध घेण्यासाठी परिसरात ट्रॅप कॅमेरे बसविले आहेत. रेस्क्यू टीमचे नचिकेत उत्पात, एजाज शेख, नरेश चांडक यांच्यासह वन कर्मचारी परिसरात बिबट्याचा शोध घेत आहेत. नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT