पुणे

पारगावमध्ये बिबट्यांची दहशत कायम

अमृता चौगुले

नानगाव; पुढारी वृत्तसेवा: पारगाव सा. मा. येथील बावीस फाटा परिसरात बिबट्यांचा वावर असल्याने या भागात शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून असलेली बिबट्यांची दहशत आजही कायम असल्याची वस्तुस्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्यांचा वावर असून, अनेकदा कोंबड्या, पाळीव कुत्रे यांच्यावर हल्ले होत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी वन विभागाशी संपर्क साधत घडणार्‍या घटनांची माहिती दिली.

रविवारी (दि. 18) रात्री नऊच्या सुमारास वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे, वनपाल सचिन पुरी, वनरक्षक शिवकुमार बोंबले, नानासाहेब चव्हाण, सुनीता शिरसाट, वनमजूर सुरेश पवार, संरक्षण मजूर ज्ञानदेव आढागळे यांनी बावीस फाटा येथे भेट देऊन पाहणी करीत नागरिकांशी संवाद साधला. या वेळी परिसरातील नागरिकांना बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी जनजागृती करण्यात आली.

शेतात एकट्याने जाऊ नये, शेतात खबरदारी घेत काम करावे, लहान मुलांची काळजी घ्यावी, रात्रीच्या वेळी फटाके वाजवावेत, रात्रीच्या वेळी बॅटरी, काठी जवळ ठेवावी, एकत्रितपणे शेतात जावे, अशा प्रकारची माहिती देण्यात आली. या ठिकाणी लवकरच पिंजरा लावण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT