निमोणे: एरवी नागरिकांना दर्शन देत त्यांची शेतातील वाट अडविणाऱ्या बिबट्याने रविवारी (दि. 7) रात्री निमोणे-शिरूर रस्त्यावर थेट पोलिसांची गाडीच थांबवली. रस्त्यात ठाण मांडून बसलेला बिबट्या गाडीच्या प्रखर प्रकाशझोतामुळे कडेला गेल्यानंतरच पोलिस पुढे जाऊ शकले.
गणेश विसर्जनानंतर कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागू नये म्हणून शिरूर पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या आदेशाने तालुक्याच्या पूर्व भागात पोलिस उपनिरीक्षक गोविंद खटिंग, कॉन्स्टेबल शेखर झाडबुके, हवालदार विनोद मोरे, हवालदार प्रताप टेंगले हे गस्त घालत होते. (Latest Pune News)
रविवारी (दि.7) रात्री दीड - दोनच्या दरम्यान पोलिसांची गाडी निमोणे मार्गे शिरूरच्या दिशेने जात असताना निमोणे गावच्या हद्दीत सुनसान रस्त्यावर गाडी चालकाने अचनाक बेक दाबला. गाडी का थांबली असे पोलिस पुटपुटु लागले असतानाच पोलिसांना रस्त्यावर ठाण मांडलेला बिबट्या दिसला.
पूर्ण वाढ झालेला बिबट्या जागचा हलायला तयार नव्हता. गाडीच्या प्रखर उजेडामुळे क्षणभर बिबट्यालाही काही अंदाज येईना आणि पोलिसांनाही काय करावे ते कळेना. एक दुसऱ्याचा अंदाज घेतल्यानंतर बिबट्याने दोन पावलं मागे घेत रस्त्याच्या कडेला ठाण मांडले. बिबट्याने रस्ता सोडल्यानंतर पोलिस तेथून पुढे गेले.
जाताना परिसरातील लोकवस्तीला सावध करण्यासाठी स्थानिक पोलिस पाटील इंदिरा जाधव यांच्याशी संपर्क साधला. वस्तीवरील लोकांना बिबट्या या परिसरात आहे याची कल्पना द्या असा निरोप ठेवून पोलिसांची गाडी मार्गस्थ झाली, शिरूर तालुक्यात रात्री पिकांना पाणी द्यायला जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बिबट्याची दहशत कायमची आहे. या परिसरातील बिबट्या तातडीने जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी वन विभागाकडे नागरिक करीत असतात. वनखाते कधी पिंजरा लावते तर
कधी या मागणीकडे दुर्लक्ष करते. पिंजऱ्यात अनेकदा बिबट्या कैद होतो. परंतु, नंतर शिवारात पुन्हा त्याचे दर्शन होते हे या भागातील वास्तव आहे. बिबट्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी या भागातील ग्रामस्थांनी केली आहे.