मंचर: आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागातील राजेवाडी येथे सलग तीन दिवस बिबट्याचे दर्शन झाले आहे. दत्तात्रय रामचंद्र साबळे यांच्या घरासमोर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा बिबट्या स्पष्टपणे दिसला असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शुक्रवार, दि. 12 ते रविवार, दि. 14 सप्टेंबरदरम्यान रात्रीच्या वेळी हा बिबट्या घराजवळ दिसला. गेल्या काही दिवसांपासून गावातील पाळीव कोंबड्या व कुर्त्यांवर हल्ले होत असल्याने ग्रामस्थांमध्ये शंका होती. सुरुवातीला प्राणी कोणता याबाबत संभम होता; मात्र साबळे यांच्या घरासमोर बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये सलग तीन दिवस बिबट्याचे दर्शन झाल्याने खात्री पटली. (Latest Pune News)
बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. लहान मुले व वयोवृद्धांना बाहेर जाणेही धोक्याचे ठरले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी वन विभागाशी संपर्क साधून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी केली आहे.