लोणी-धामणी: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी, धामणी, पहाडधरा, शिरदाळे, वडगावपीर, मांदळेवाडी, तसेच वाळुंजनगर व खडकवाडी या बागायती पट्ट्यात बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषत: शेतकरीवर्ग धास्तावलेला असून, वन विभागाकडे तातडीने पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
गेल्या चार महिन्यांपासून खडकवाडी-लोणी तसेच लोणी-सविंदणे रस्त्यावर बिबट्यांच्या दर्शनाच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही वेळा बिबट्यांनी दुचाकीस्वारांवर झडप घालण्याचा प्रयत्न केला आहे. (Latest Pune News)
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी जीवघेण्या प्रसंगांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. लोणी व धामणीच्या डोंगराळ परिसरात बिबट्याने अनेकदा शेळ्या-मेंढ्यांवर हल्ले करून शेतकर्यांचे आर्थिक नुकसान केले आहे. नुकतीच धामणीतील खंडोबा मंदिर परिसरात बिबट्याने एक शेळी ठार केली.
महिन्यापूर्वी वाळुंजनगर येथे लावलेल्या पिंजर्यात एक मादी बिबट्या व तिचा बछडा जेरबंद झाला. त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी एक बछडा वेगळ्या पिंजर्यात अडकला. त्यामुळे वन विभाग एका गावातून पकडलेल्या बिबट्याला दुसर्या गावात सोडत तर नाही ना? असा संशय व्यक्त होत आहे.
याशिवाय, बिबट्यांच्या हल्ल्यात जनावरे ठार झाल्यास मिळणारी भरपाई अत्यंत कमी असून, तीही वेळेवर मिळत नसल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मानवी जखमींच्या बाबतीतही वन विभागाकडून उपचार खर्चाबाबत अपुरा प्रतिसाद मिळतो, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर वन विभागाने अधिक दक्षता घेणे, त्वरित पिंजरे लावणे आणि भरपाई प्रक्रिया गतिमान करणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.