पुणे : फुरसुंगी, कवडी पाट, शेवाळेवाडी, मांजरी आणि द्राक्ष बागायत केंद्र आदी भागात गेल्या आठवडाभरापासून बिबट्याचा वावर असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले आहे. काही नागरिकांनी त्याला प्रत्यक्ष पाहिले असून वन विभागाही कळवण्यात आले आहे.
या परिसरात बिबट्याच्या हालचालींची नोंद झाली आहे. ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या आठवड्यापासून बिबट्या फुरसुंगी, मांजरी, शेवाळेवाडी आणि वडकी यांसारख्या परिसरात दिवसाढवळ्या दिसू लागला आहे.
एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे, ज्यात फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या मागील भागात बिबट्या दिसून आला. त्याचबरोबर फुरसुंगी परिसरातील एका शेड मध्ये ही बिबट्या काही वेळ थांबल्याचे आढळून आले आहे.
वनविभागाकडून परिसरात पाहणी करण्यात आली असून काही ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहेत. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून एका शेळीवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे.
वन विभागाकडून या परिसरात खबरदारी घेतली जात आहे. दोन दिवसांपासून संबंधित अधिकारी आणि कर्मचारी या परिसरात चौकशी करीत असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. बिबट्याचा वावर असला तरी कोणत्या परिसरात आहे त्यानुसार पिंजरा लावण्याबाबत पुढील निर्णय घेऊ.- महादेव मोहिते (उपवनसंरक्षक, पुणे वन विभाग)
गेल्या दोन दिवसांपासून या परिसरातील नागरिकांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली जात आहे. अनेकांनी आलेल्या फोटोवर वन विभागाला माहिती दिली होती. फक्त एका व्यक्तीने बिबट्या पाहल्याचे सांगितले असून त्यानुसार तीन ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहेत. पुढील दोन ते तीन दिवस पुन्हा लक्ष ठेवण्यात येईल आणि त्याप्रमाणे पिंजरा लावण्याचा निर्णय घेण्यात येईल.- सुरेश वरक (वन संरक्षक, पुणे वन विभाग)