पुणे : रात्रीच्या थंड वातावरणात उष्ण रक्ताचा जीवंत प्राणी फिरत असेल, तर तेथे लाल स्पॉट दिसतो. त्याला थर्मल ड्रोन कॅमेरा म्हणतात. याद्वारे गत 72 तासांपासून औंध, बाणेर परिसर रात्री पिंजून काढला जात आहे. मात्र त्यात बिबट्या कुठेही आढळला नाही. तो सिंध कॉलनीतून निघणाऱ्या नाल्याच्या काठाने फिरत असल्याचे ठसे मात्र दिसले आहेत.
दिवस उजाडला की बिबट्या लपून बसतो. नंतर अंधार सुरू होताच बाहेर पडतो. त्यामुळे वन विभागाचे अधिकारी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा थर्मल ड्रोन कॅमेऱ्याने त्याचा शोध घेत आहेत. 72 तासांपासून रात्री हा थर्मल ड्रोन औंध, बाणेर भागातून फिरवला जात आहे. मात्र अजून बिबट्या त्यात दिसलेला नाही.
थर्मल या शब्दातच तापमानाचे गुपित दडले आहे. रात्री सृष्टीतील वातावरण थंड होते. अशा वेळी माणूस, जनावर कुठूनही जात असेल, तर त्याचे शरीर हे वातावरणातील तापमानापेक्षा जास्त तापमानाचे असते.
त्यामुळे थर्मल ड्रोन तेथे लाल स्पॉट दाखवतो. त्यावरून तो शोध घेत कॅमेऱ्याने त्या उष्ण रक्ताच्या प्राण्याचे फोटो काढता येतात. वन्यजीव पकडण्यासाठी हा थर्मल ड्रोन तयार करण्यात आला आहे.
त्याची किंमत 3 लाख 50 हजार रुपयांपासून सुरू होते. तो तापमानाला संवेदनशील असतो.
त्यामुळे रस्त्यावरील हायटेन्शन वायरपासून खूप लांब उडवावा लागतो.
जेथे-जेथे उष्णता अन् वातावरणापेक्षा जास्त तापमान आढळेल तेथे तो लाल स्पॉट दाखवतो.
माणसासह हिंस्रप्राणी तो त्याच्या तापमानावरून शोधतो.
पुणे वन विभागाचे अधिकारी अन् रेस्क्यू संस्थेतील कर्मचारी तीन दिवसांपासून सिंध, आरबीआय सोसायटीसह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि औंध, बाणेर भागातील मोठ्या सरकारी संस्थांत बिबट्याचा रात्रीच्या वेळी शोध घेत आहेत. या भागात मोठी झाडी असून, तो तेथे वावरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवारी मध्यरात्री वनाधिकाऱ्यांनी बाणेर भागातील एनसीएल (राष्ट्रीय रासायनिक संस्था) चा भव्य परिसर पिंजून काढला. ही संस्था 70 ते 80 एकर परिसरात असून, दाट झाडी या ठिकाणी आहे. मात्र तेथेही बिबट्या आढळला नाही.