पुणे; पुढारी वृत्तसेवा: जुन्नर तालुक्यातील प्रस्तावित बिबट्या सफारी बारामती तालुक्यात घेऊन जाण्याचा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा डाव अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाणून पाडला. बारामती तालुक्यातील बिबट्या सफारी पार्कचा प्रस्ताव रद्द करून ही सफारी जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथे करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी टि्वटरवरून केली.
शासकीय परिपत्रकात मात्र याचा उल्लेख नाही. मुख्यमंत्री यांनी एकाच निर्णयात दोन पक्षी मारले असून, बारामतीचा प्रस्ताव रद्द करत शिंदे गटाचे समर्थक माजी आमदार शरद सोनवणे यांची आंबेगव्हाणची मागणी देखील पूर्ण केली. राज्यात सत्तांतर होताच महाआघाडी सरकारने प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनमानी पध्दतीने घेतलेले अनेक निर्णय रद्द करण्याचा सपाटा शिंदे- फडणवीस सरकारने लावला आहे. याचाच एक भाग म्हणजे बारामती येथील बिबट्या सफारीचा प्रस्ताव अखेर रद्द करण्यात आला.
जुन्नर तालुक्यातील प्रस्तावित बिबट्या सफारी बारामती तालुक्यात उभारण्याची घोषणा पवार यांनी अर्थसंकल्पात केली. बिबट सफारी कुठं होणार यावरून राजकारण सुरू असतानाच पवार यांनी बारामती तालुक्यात गाडीखेल येथील 100 हेक्टर जागेत बिबट सफारीसाठी 60 कोटींच्या निधीची तरतूद केली. जु्न्नरमधील जनतेने या विरोधात आंदोलन केले. याबाबत राष्ट्रवादीचेच आमदार अतुल बेनके यांनी अधिवेशनात याबाबत आवाज उठवला. त्यानंतर बारामतीसह जुन्नरमध्ये देखील बिबट्या सफारी करण्यात येईल असे पवार यांनी स्पष्ट केले.