पुणे

शिरूरमध्ये बिबट्याचे हल्ले काही थांबेनात

अमृता चौगुले

मांडवगण फराटा(ता. शिरूर); पुढारी वृत्तसेवा : मांडवगण फराटा परिसरामध्ये बिबट्याची पुन्हा दहशत वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मांडवगण फराटा येथील शेतकरी नवनाथ शिवाजी फराटे पाटील यांच्या गोठ्यात गुरुवारी (दि. 26) मध्यरात्रीच्या सुमारास बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला केला. शिरूरच्या पूर्व भागामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याने अनेक शेळ्या, कुत्री, मेंढ्या, कोंबड्या, वासरे यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले आहे. अनेक पाळीव प्राण्यांनादेखील जखमी केले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेसाठी गोठे तयार केले आहेत. तरी देखील बिबट्याचा प्राण्यांवरील होणारा हल्ला काही थांबेना.

या भागामध्ये वन विभागाने यापूर्वी चार ते पाच बिबटे पकडले आहेत. तरी देखील या परिसरामध्ये अजून मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर असल्याचे दिसून येत आहे. शेतामध्ये मजूर काम करताना रात्री-अपरात्री शेतकरी शेतावर पाणी देण्यासाठी जात असताना अनेकवेळा शेतकर्‍यांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. वडगाव रासाई व इनामगाव या गावांमध्ये बिबट्याने काही दिवसांपूर्वी माणसावरच हल्ला केला होता. पण, नशीब बलवत्तर म्हणून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अनेकवेळा वन विभागाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, यासाठी निवेदने देण्यात आली. तरी देखील या भागामध्ये म्हणावा असा बंदोबस्त करण्यात आलेला नाही. ज्या वेळेस एखादी मानवी दुर्घटना घडून येईल तेव्हाच वन विभागाला बिबट्या पकडण्यासाठी जाग येईल, असे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे.

सध्या या परिसरामध्ये ऊसतोडणी करण्यासाठी अनेक कामगार आले आहेत. त्यांची मुले बिनधास्तपणे ऊसफडात खेळत असतात. ऊसतोडणी करीत असताना अनेक कामगारांना बिबट्याची पिले उसाच्या शेतात आढळून आली आहेत. त्यामुळे अनेकवेळा कामगारांनी बिबट्याची पिले पाहून ऊसतोडणी बंद केली आहे. त्यामुळे याचा फटका ऊसमालकाला बसत आहे. कारण की पुन्हा त्याच ऊसशेतात जाण्यासाठी ऊसतोडणी कामगार घाबरत आहेत. त्यामुळे वन विभागाने शेतकर्‍यांचे गांभीर्य लक्षात घेऊन बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

SCROLL FOR NEXT