पुणे

चास येथे बिबट्याने केल्या 7 कोंबड्या फस्त

अमृता चौगुले

महाळुंगे पडवळ; पुढारी वृत्तसेवा : बिबट्याने कोंबड्यांच्या खुराड्यातील सुमारे सात कोंबड्या फस्त करण्याची घटना चास- राजेवाडी (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (दि. 8) रात्री घडली. शेतकरी धनेश पांडुरंग चासकर यांच्या गोठ्यात रात्री बिबट्याने पाळीव गाईवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. शेजारील रहिवाशांनी आरडाओरड केल्याने बिबट्या तारेच्या कुंपणातून पलायन केले. चास बजरंग दलाचे प्रमुख नितीन ईश्वर चासकर यांनी ही घटना वन विभागाला कळविली. वनपाल शशिकांत मडके, वनरक्षक प्रदीप आवटी, वनमजूर सुदाम वाळुंज यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला आहे. कैलास माठे, धनेश चासकर, नितीन माठे, ज्ञानेश्वर माठे यांनी पिंजरा लावण्यास मदत केली.

आंबेगावच्या उत्तर भागात ऊस तोडणी वेगाने सुरू असल्याने बिबट्यांची लपण जागा कमी झाली आहे. भक्ष शोधण्यासाठी मागील काही महिने बिबट्याचे थांबलेले हल्ले पुन्हा सुरू झाले आहेत. परिसरातील नागरिक यामुळे भयभीत झाले आहेत. वनविभागाने राजेवाडी येथे पिंजरा लावला आहे.

या विभागाच्या जिल्हा परिषद माजी सदस्या तुलशी भोर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा अध्यक्ष सचिन भोर, भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाजीराव बारवे यांनी घडलेल्या घटनेची माहिती घेतली. मंचर येथील वन विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क केला आहे. लोकांनी भयभीत न होता मोठ्या आवाजाचे फटाके वाजवावेत, गटागटाने रात्री अपरात्री फिरावे. शेताला पाणी देताना दोनपेक्षा जास्त लोकांनी एकत्र राहावे, अशा सूचना वनविभागाच्या कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत.

SCROLL FOR NEXT