पुणे

जुन्नरच्या नागरी वस्तीतून बिबट्या जेरबंद, शहरात आढळलेला चौथा बिबट्या

अमृता चौगुले

जुन्नर; पुढारी वृत्तसेवा : जुन्नर शहरातील कल्याण पेठ परिसरातील नागरी वस्तीमध्ये संचार करणारा 10 वर्षे वयाचा पूर्ण वाढ झालेला नर बिबट्या पिंजर्‍यात पकडण्यात वन विभागाला यश आले. जुन्नरमधील नागरी वस्तीमध्ये आढळलेला हा चौथा बिबट्या आहे. दाट नागरी लोकवस्ती, तसेच शाळा, हॉटेल आदी वर्दळीचा भाग असलेल्या कल्याण पेठ परिसरात भरदिवसा बिबट्याचे दर्शन होत असल्याने, तसेच रात्रीच्या वेळी त्याचा गुरगुरण्याचा आवाज येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.

जुन्नर शहरातील आगर पेठ या ठिकाणी काही दिवसांपूर्वी एकाच ठिकाणी तीन बिबटे पिंजर्‍यात पकडण्यात वन विभागाला यश आले होते. कल्याण पेठ येथील नंदनवन सोसायटीलगतच्या नाल्याच्या झुडपांमध्ये बिबट्या असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून व्यक्त होत होत्या. त्यानुसार वन विभागाने शनिवारी (दि. 24) या ठिकाणी पिंजरा लावलेला होता. त्यामध्ये रविवारी (दि. 25) पहाटेच्यादरम्यान हा पूर्ण वाढ झालेला बिबट्या जेरबंद झाला. जुन्नरमध्ये पकडण्यात आलेला चौथा बिबट्या आहे.

वन परिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल नितीन विधाटे, नारायण राठोड, स्वरूप रेंगडे, संतोष भालेकर आदींनी या भागांत पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्यात सहकार्य केले. हा बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दरम्यान, वन विभागाने पकडलेल्या बिबट्याची रवानगी माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रामध्ये करण्यात आली.

SCROLL FOR NEXT