नारायणगाव : पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथील संतोष सदाशिव पोखरकर यांच्या शेताजवळ पाच दिवसापूर्वी लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्याची मादी गुरुवारी (दि. ११) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास जेरबंद झाली. तिला माणिकडोह येथील निवारा केंद्रात हलवले असल्याची माहिती वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी दिली. (Pune Latest News)
संतोष पोखरकर यांच्या बंगल्याच्या पाठीमागे लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्याची मादी जेरबंद झाली. दरम्यान या परिसरामध्ये अद्यपही दोन बिबटे असल्यामुळे वन खात्याने पुन्हा पिंजरा लावावा, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे
या ठिकाणी बिबट्याचा गेल्या महिन्याभरापासून बिबट्याचा वावर असल्याने स्थानिक नागरिक उत्तम वऱ्हाडी, संतोष पोखरकर यांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. परिसरातील शेतकऱ्यांचे पाळीव कुत्रे या बिबट्याने फस्त केले होते. तसेच शेळ्या देखील बिबट्याने ठार केल्या होत्या. उप वनसंरक्षक प्रशांत खाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिता होले वनरक्षक पवार वनरक्षक बनसोडे आपदा मित्र मास्टर ट्रेनर सुशांत भुजबळ यांनी या ठिकाणी पिंजरा लावला होता.
भक्ष म्हणून पिंजऱ्यामध्ये कोंबडी ठेवण्यात आली होती. दरम्यान गुरुवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती समजताच वनविभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी पोचले व त्यांनी त्या बिबट्याच्या मादीला माणिकडोह येतील निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे. पिंपळगाव येथील बिबट्याचा पिंजरा हलवण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना महेश चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, रवींद्र चकटे, रोहिदास वराडी उत्तम वराडी गणेश वऱ्हाडी यांनी मदत केली.
दरम्यान जर या परिसरामध्ये बिबट्याचा वावर व उपद्रव असेल तर पुन्हा त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात येईल अशी माहिती वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी दिली.