वाडा : वाळद (ता. खेड) येथील डोंगरदऱ्यात धुमाकुळ घातलेला बिबट्या गुरूवारी (दि. ६) पहाटे पाचच्या सुमारास वनविभागाने संतोष लक्ष्मण गाडेकर यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. सुमारे १० वर्ष वय असलेली पुर्ण वाढ झालेली ही मादी बिबट असल्याचे वनपरिमंडल अधिकारी डी. डी. फापाळे यांनी सांगीतले.(Latest Pune News)
गेली काही वर्षांपासून वाळद व परिसरात डोंगररांगात बिबट्याने धुमाकुळ घातला होता. वाळदपासून काही अंतरावर असलेल्या भिवेगांव येथील लक्ष्मण वनघरे यांचा बिबट्याच्या हल्यात मृत्यू झाला होता, तर धुवोली अजय जठार यांचा मृत्यू झाला होता. याशिवाय परिसरातील अनेक पाळीव जनावरे, कुत्रे, कोंबड्या यांच्यावर हल्ला करत बिबट्यांने त्यांना फस्त केले होते. रात्रीच्या वेळेस बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू येत असल्याने परिसरातील नागरिक घाबरलेले अवस्थेत जीवन जगात होते.
याबाबत वाळद गावचे सरपंच मनोहर पोखरकर व ग्रामस्थांनी वन विभागाला विनंती करून मोठ्या प्रमाणात पिंजरे लावण्याची मागणी केली होती; मात्र पिंजऱ्याला गुंगारा देत बिबट्या फिरत होता. वनपरिक्षेत्र अधिकारी वाय. यु. जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी डी. डी. फापाळे, वनरक्षक एस. वाय. आंबेकर, एस. एस. मुऱ्हे यांनी गेली काही दिवसांपूर्वी वाळदच्या गाडेकर वाडीत लावलेल्या पिंजऱ्यात गुरवारी बिबट्या अखेर जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
वाळद (ता. खेड) गाडेकरवाडी येथे पिंजऱ्यात जेरबंद झालेली मादी बिबट.
परिसरात बिबट्या व वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याने ग्रामस्थांनी सावधानता बाळगावी. वनविभागाने दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करावे. रात्री-अपरात्री विनाकारण घर बाहेर पडू नये. लहान मुलांनची काळजी घ्यावी.डी. डी. फापाळे, वनपरिमंडल अधिकारी
गावात बिबट्यांची दहशत अजून असल्याने वन विभागाने गावाच्या सुरक्षेसाठी लागणारे साहित्य त्वरित पुरवावे व आणखी तीन पिंजरे बसवावे.मनोहर पोखरकर, सरपंच, वाळद