मंचर; पुढारी वृत्तसेवा : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील वरचा हिंगेमळा (घाटी वस्ती) येथील शामकांत नरहरी हिंगे यांच्या शेतातील मक्याच्या पिकात बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला. बछडा आढळल्याने मादीला जेरबंद करण्यासाठी या परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
गुरुवारी (दि. 15) सकाळी आठ वाजता शामकांत हिंगे मक्याच्या पिकाला पाणी भरण्यासाठी आले असता मका पिकाला पाणी पोहचले किंवा नाही हे पाहण्यासाठी ते शेतात आले. यावेळी त्यांना आत कुबट वास आला असता त्यांनी सरीत पाहिले असता बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत दिसून आले. या बिबट्याचे वय अंदाजे सहा महिने असून तो नर जातीचा आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप रौधळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप कासारे, वनरक्षक सूर्यकांत कदम, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. येवले, पोलिस पाटील माधुरी जाधव यांनी येऊन मृत बिबट्याची आणि परिसराची पाहणी केली. मृत बिबट्याचे शिवविच्छेदन करून पंचांच्या समक्ष त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पिंजरा लावणे गरजेचे
या परिसरात वारंवार बिबट्या दिसत आहे. अनेक वेळा त्याने प्राण्यावर हल्ला केला आहे. शेतकर्यांना रात्री- अपरात्री शेती पिंकाना पाणी द्यावे लागते. त्यात बिबट्याची दहशत त्यामुळे वीज वितरण कंपनीने दिवसा वीजपुरवठा करावा तसेच या भागात पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.