ओतूर(ता. जुन्नर); पुढारी वृत्तसेवा : ओतूर हद्दीतील शिवारात मेंढपाळ महिलेवर बिबट्याने अचानक हल्ला केल्याने महिला जखमी झाल्याची माहिती ओतूर वन परिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली. मंगळवारी (दि. 21) रात्री 11 वा. 30 मि. वाजता ही घटना घडली. मंगल विजय सोडणर (वय 26) असे जखमी महिलेचे नाव आहे.
हल्ल्याची माहिती मिळताच सहायक वनसंरक्षक, जुन्नर, अमित भिसे यांच्या मार्गदर्शनानुसार ओतूर वन परिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे, वनपाल सुधाकर गिते, वनरक्षक सुदाम राठोड, वन मजूर फुलचंद खंडागळे व साहेबराव पारधी यांनी त्वरेने घटनास्थळी धाव घेतली. मंगल सोडणर यांना ओतूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नारायणगाव येथील डॉक्टर मेनू मेहता मेमोरियल हॉस्पिटलला पाठविले.