वाल्हे : शेतीपूरक व्यवसाय म्हणून उभारलेल्या मांडकी (ता. पुरंदर) येथील पोल्ट्री फार्ममध्ये घुसून बिबट्याने हल्ला केला. यामध्ये 13 पेक्षा अधिक कोंबड्या मृत्युमुखी पडल्या, तर अनेक कोंबड्या गंभीर जखमी झाल्या असून, उर्वरित कोंबड्या भयभीत झाल्या आहेत. ही घटना सोमवारी (दि. 27) पहाटेच्या घडली. यामध्ये पोल्ट्रीचालकाचे किमान 15 हजार रुपयांचे नुकसान झाले.(Latest Pune News)
हल्ला करणारा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.मांडकी येथील अथर्व साळुंखे व महेंद्र साळुंखे यांची ही पोल्ट्री आहे. साळुंखे यांची अंड्याच्या कोंबड्यांची पोल्ट्री आहे. सोमवारी पहाटे मांडकी-हरणी रस्त्यालगत असलेल्या या पोल्ट्री फार्मवर बिबट्याने हल्ला केला.
या वेळी वीजपुरवठा खंडित असला तरी नाईट व्हिजन कॅमेरे असल्याने बिबट्या आल्याचे व गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. प्रत्येक कोंबडीसाठी स्वतंत्र जाळी असते, त्यामुळे मोठं नुकसान टाळलं आहे; मात्र बिबट्याने पोल्ट्रीमध्ये जाळीतून मुंडके बाहेर काढलेल्या कोंबड्यांची मुंडके तोडून ती खाल्ली आहेत. या पोल्ट्रीमध्ये आलेला बिबट्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. वन विभागाचे अधिका-यांनी या पोल्ट्रीला भेट दिली.
याबाबत महेश साळुंखे म्हणाले की, याठिकाणी आमची 2 हजार 500 पक्षांची म्हणजेच अंडी देणाऱ्या कोंबड्यांची पोल्ट्री आहे. सध्या आमच्याकडील पक्षी 19 आठवड्याचा आहे. हा पक्षी किमान 20 महिने अंडी देतो. पक्षी वाढवायला आत्तापर्यंत प्रत्येक पक्षाला 500 रुपये खर्च झाला आहे. रात्री झालेल्या हल्ल्यात किमान 15 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आमचं सततचं नुकसान टाळायचं असेल तर वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करायला हवा.
सध्या मांडकी परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात ऊस आहे, त्यामुळे उसाच्या शेतात लपलेला बिबट्या लवकर दिसत नाही. लोकांनी शेतात जाताना स्वतःची काळजी घ्यावी. शेतात जाताना शक्यतो मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावावीत. शेतातील वस्तीवरील लोकांनी आपल्या वस्तीच्या आजूबाजूला रात्रभर लाईट लावावी. या घटनेबाबत वन विभागाला कळवले आहे; मात्र त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे लोकांनी सावध राहावे.श्रीतेज जगताप, पोलिस पाटील, मांडकी