file photo  
पुणे

पुणे : दागिने हिसकावणार्‍या हातात पडल्या बेड्या !

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  दागिने हिसकावणार्‍या दोन टोळ्यांतील पाच चोरट्यांना पर्वती पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आले असून, सात लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. चोरट्यांविरुद्ध जळगाव, अकोला, पुणे, अमरावती शहरात दागिने हिसकावण्याचे 30 गुन्हे दाखल आहेत. राखी पौर्णिमेला दागिने हिसकावणार्‍या चोरट्यांना पकडून पोलिसांनी अनोखी भेट दिली.

आकाश ज्ञानेश्वर सूर्यवंशी (वय 25, रा. दत्तनगर, कात्रज), लोकेश मुकुंदा महाजन (वय 24), प्रसाद ऊर्फ परेश संजय महाजन (वय 25), संदीप अरविंद पाटील (वय 28), दीपक रमेश शिरसाठ (वय 25 , सर्व रा. जळगाव) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
रिक्षा प्रवासी महिलेचे दागिने पर्वती भागातून हिसकावून नेल्याची घटना 24 ऑगस्ट रोजी घडली होती. याच दिवशी सदाशिव पेठेत पादचारी महिलेचे दागिने दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले होते. या गुन्ह्याचा तपास पर्वती पोलिसांकडून करण्यात येत होता. सहायक पोलिस आयुक्त अप्पासाहेब शेवाळे यांनी तपास पथकांना चोरट्यांचा माग काढण्याचे आदेश दिले होते.

पोलिस उपनिरीक्षक सुनील जगदाळे, चंद्रकांत कामठे यांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते. पोलिस कर्मचारी किशोर वळे यांना चोरट्यांची माहिती मिळाली. चोरटे शिवाजीनगर भागातून प्रवासी बसने जळगावला पसार होण्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा लावून चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले. चोरट्यांनी भारती विद्यापीठ, बिबवेवाडी, सहकारनगर, विश्रामबाग पोलिस ठाण्यांच्या हद्दीत महिलांचे दागिने हिसकावल्याची कबुली दिली.

अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील, सहायक आयुक्त अप्पासाहेब शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय खोमणे, हवालदार कुंदन शिंदे, प्रकाश मरगजे, किशोर वळे, अमित सुर्वे, अनिस तांबोळी, दयानंद तेलंगे पाटील आदींनी ही कारवाई केली. या टोळीचा प्रमुख आकाश सूर्यवंशी हा आहे. आकाश सूर्यवंशी हा जळगावमध्ये वाळू तस्करीचे काम करीत होता. मध्यंतरी वाळू लिलाव बंद असल्याने आकाशने आपला मोर्चा चेन स्नॅचिंगकडे वळविला. आकाश व त्याचे सहकारी एका शहरात जास्त वेळ न राहता येत जात असत. पुण्यात ते दर एक महिन्याला महिलेचे दागिने चोरत ट्रॅव्हल्सने गावाला जात असे. आकाशकडे केटीएम कंपनीची महागडी मोटारसायकल आहे. त्या माध्यमातून तो चोरी करीत असे.

दागिन्याची विक्री जळगावात
दोन्ही टोळ्यातील सर्व आरोपी हे जळगाव येथील आहेत. पुण्यात ते दागिने चोरी करण्यासाठी येत होते. चोरीच्या दागिन्यांची विक्री जळगावात करत होते. ठरावीक कालावधीनंतर ते पुण्यातून पसार होत. त्यामुळे पोलिसांना ते सापडत नव्हते. मात्र, पर्वती पोलिसांच्या तपास पथकाने त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT