ओतूर : ओतूर (ता. जुन्नर) येथील ओतूर ते अहिनवेवाडी मार्गावर शेटेवाडी परिसरात बिबट्याने दोन दुचाकींवर हल्ला केला. यात त्याने दुचाकींवरील तीन तरुणांना किरकोळ जखमी केले आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ३) रात्री ७ ते ८ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, याच ठिकाणी एक मादी बिबट व दोन बछडे निदर्शनास आल्याचे नागरिकांनी सांगितले.(Latest Pune News)
पहिली घटना ७.३० वाजता घडली. यात दुचाकीवर चाललेले दालचंद लेखराज सिंग (वय ४०) हे जखमी झाले आहेत. त्यानंतर त्याच ठिकाणी ८ वाजेता दुचाकीवरून लक्ष्मण बबन गोंडे (वय ३७), ईश्वर रामदास जाधव (वय ४३) चालले होते. त्यांच्या दुचाकीवर बिबट्याने झेप घेऊन हल्ला करीत दोघांनाही जखमी केले. सर्व जखमींना स्थानिक नागरिकांनी ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. तेथे त्यांच्यावर डॉ. श्रीहरी सारोक्ते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रशांत गोरे व डॉ. वैष्णवी ठिकेकर यांनी उपचार केले.
या बिबट्याच्या हल्ल्याबाबत माहिती समजताच ओतूरचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या वनपाल सारिका बुट्टे, वनरक्षक विश्वनाथ बेले, दादाभाऊ साबळे, किसन केदार, गणपत केदार, फुलचंद खंडागळे, गंगाराम जाधव, रोहित लांडे यांच्या पथकाने जखमी तरुणांची भेट घेतली. तसेच त्यांनी जखमींना पुढील उपचारासाठी नारायणगाव येथे दाखल केले.
दरम्यान, जुन्नर तालुक्यातील सर्व राजकीय नेत्यांनी एकत्रितरित्या बिबटमुक्त तालुका करण्यासाठी केंद्रस्तरावर प्रयत्न करावेत अशी मागणी तालुक्यातून होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते कैलास बोडके यांनी सांगितले.