पुणे

पिंपरी : कॉर्पोरेट विश्व सोडून ‘बासरी’शी जोडले नाते

अमृता चौगुले

संतोष शिंदे :

पिंपरी : तुम्हाला अमेरिका सारख्या देशात प्रशस्त घर आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील नामांकित कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरीची ऑफर आली, तर तुमचा आनंद गगनात मावणार नाही. मात्र, या सर्व भौतिक सुखांना लाथाडून एक अवलिया पिंपरी चिंचवड शहरातील महापालिकेच्या गार्डनमध्ये मनशांती शोधत आहे. मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांसमोर ते बासरीवादन करीत आहे. संगीत क्षेत्रातून मिळणारे आत्मिक समाधान हे लाखो रुपये खर्च करूनही मिळत नाही, असे ते मोठ्या आत्मविश्वासाने नागरिकांना सांगतात.
विश्वास करंदीकर (53, रा. प्रथम हाऊसिंग सोसा. वाकड) असे या अवलियाचे नाव आहे.

विश्वास करंदीकर मूळचे नागपूरचे असून ते उच्चशिक्षित आहेत. दरम्यान, सन 1994 मध्ये अमेरिका येथे त्यांना एका नामांकित कॉर्पोरेट कंपनीत उच्च पदावर नोकरी मिळाली. अल्पावधीतच त्यांनी अमेरिकेत एक स्वतःच्या मालकीचे घरही खरेदी केले. काही दिवसातच करंदीकर आर्थिक परिस्थिती पालटून गेली. जीवनात सर्व काही मिळवूनही त्यांना आत्मिक समाधान मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी अमेरिका सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला.

संगीत क्षेत्राची आवड असल्याने त्यांनी राहण्यासाठी पुण्यातील पिंपरी- चिंचवड शहर निवडले. पिंपरी चिंचवड येथील वाकड भागात स्थायिक झाल्यानंतर ते हिंजवडी येथील इन्फोसिस या कंपनीत नोकरीला लागले. इन्फोसिसमध्ये पाच वर्षे नोकरी केल्या नंतर त्यांना पुन्हा हातातून काहीतरी निसटत असल्याचे जाणवू लागले. दरम्यानच्या काळात करंदीकर यांना बासरी वादनाचा छंद निर्माण झाला. यामध्ये त्यांना आत्मिक समाधानही मिळू लागले होते. त्यामुळे त्यांनी पूर्णवेळ बासरी वादनच करायचे ठरवले. मात्र, पत्नी, मुले, नातेवाईक व समाज काय म्हणेल, या भीतीने त्यांनी काही दिवस स्वतःचे मन मारून दिवस ढकलले.

एका रात्री शांत बसून त्यांनी पुन्हा विचार केला. सामान्य नागरिकाप्रमाणे उर्वरित आयुष्य काढण्यासाठी लागणारी पुंजी त्यांच्याकडे होती. दोन्ही मुलांनी चांगले शिक्षण घेतले होते. त्यामुळे त्यांच्या भविष्याची चिंता करंदीकर यांना वाटत नव्हती. अखेर त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. मित्र परिवाराने करंदीकर यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, करंदीकर आपल्या मतावर ठाम राहिले. पुढे त्यांनी बासरी वादनाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर बासरीच्या सुरात ते तासंतास रमू लागले.

'पैसा' हा सर्वार्थाने गौण वाटत असल्याने करंदीकर आपली कला नागरिकांसमोर विनामूल्य सादर करण्यास सुरुवात केली. त्यासाठी ते शहरातील मोठी उद्याने, मंदिर परिसरात जाऊन बासरीवादन करतात. गार्डनमध्ये डॉक्टरच्या सांगण्यानुसार चालण्यासाठी आलेली पेशंट मंडळी तल्लीन होऊन बासरी ऐकतात. एकंदरीतच करंदीकर यांच्या बासरीमुळे नागरिकांच्या दिवसाची सुरुवात चांगली होत असल्याचे दिसून येते. …

SCROLL FOR NEXT