पुणे

Maratha Reservation : पुणे जिल्ह्यात ‘या’ गावात नेत्यांना बंदी; बंदी करणारे पहिले गाव

अमृता चौगुले

कडूस; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत चासकमान धरण परिसरातील आदर्श गाव वेताळे येथे आमदार, खासदार तसेच तालुक्यातील नेत्यांना येण्यास आणि गावामध्ये कोणताही राजकीय कार्यक्रम घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी मराठवाडा, खानदेशच्या धर्तीवर नेत्यांना गाव बंदी करणारे जिल्ह्यातील वेताळे (ता.खेड) हे पहिले गाव आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन आता प्रखर होताना दिसत आहे. नेत्यांना गावबंदी निर्णयाचा फ्लेक्स गावामध्ये दवंडी करून लावला आहे. आरक्षणाला विरोध करून आपल्यामध्ये फूट पाडणारे मराठा समाजाचे नेते मंत्री नारायण राणे, रामदास कदम यांचा मुंडन करून निषेधदेखील या वेळी करण्यात आले.

सध्या खेड तालुक्यातील अनेक गावांतील मराठा बांधवांनी सर्व राजकीय नेत्यांना गावबंदीचे फ्लेक्स गावाच्या प्रवेशद्वारावर झळकविण्यास सुरुवात केली आहे. गावागावात केंद्र आणि राज्य सरकारच्या सत्तेतील मंत्र्यांचे फोटो लावून रावणदहन करण्यात येणार असल्याने गावातील मराठा बांधव स्थानिक पातळीवरील गट-तट, भावकीचे वाद-विवाद बाजूला ठेवत मराठा आरक्षणासाठी पुढे येताना दिसत आहेत.

ग्रा. पं. निवडणुकीतून माघारी घेणार

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीच्या अर्ज माघारीचा दिवस दसरा सणानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी (दि. 25) असल्याने नामनिर्देशन पत्र माघारीच्या वेळी मराठा बांधव एकवटुन माघार घेण्याचा निर्णय घेण्याची चर्चा जोरात सुरू आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT