पुणे: शहरात चालत्या कारमध्ये एका वकील तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. ही घटना रविवारी (दि.17) रात्री कोरेगाव पार्क परिसरात घडली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांना ताब्यात घेतले आहे. अभिषेक नवनाथ मुकटे, धनंजय सोरटे आणि आदेश शिंदे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी मूळची पटणा येथील आहे. तिचे वकिलीचे शिक्षण पुणे शहरात झाले आहे. ती कामानिमित्त पुण्यात आली होती. दरम्यान, रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास ती कोरेगाव पार्क येथील एका पबमध्ये बसली होती.
तिने विवाह संकेतस्थळावरून ओळख झालेल्या व्यक्तीस तेथे बोलावून घेतले होते. संबंधित व्यक्ती तेथे दोन महिलांना घेऊन आला होता. चर्चा झाल्यावर ते तिघे निघून गेले. तरुणी मद्यपान करत असताना शेजारील टेबलावरील दोघांशी तिची ओळख झाली. यानंतर ते तिथून दुसऱ्या पबमध्ये गेले. तेथे गर्दी नसल्याने तिघांनी बंडगार्डन येथील एका पबमध्ये जाण्याचे ठरवले.
कारमधून जात असताना त्यातील एकाने तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. तसेच, पबमध्ये असलेल्या इतर दोन मित्रांना कॉल करून कॉल साऊंडवर ठेवून त्यांना तरुणीबद्दल माहिती दिली. तेव्हा समोरील दोघांनी तिच्याबद्दल अश्लील कमेंट केल्या. यामुळे तिने संबंधित दोघांना माफी मागण्यासाठी बोलावून घेण्यास भाग पाडले.
गाडीतून खाली उतरल्यावर तिची चौघांबरोबर वादावादी झाली. यानंतर चौघेही तिची पर्स रस्त्यावर टाकून पळून गेले. तिने तेथून स्थानिक व्यक्तीची मदत घेऊन मित्राला बोलावून घेतले. यानंतर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेतले आहे, तर त्यांच्या अन्य एका साथीदाराचा शोध घेत आहेत.
या प्रकरणात तिघांना ताब्यात घेतले असून, चौथ्या आरोपीच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली आहेत.अमितेश कुमार, पोलिस आयुक्त