पौड (पुणे), पुढारी वृत्तसेवा: गेली सहा महिने बंद असलेले लवळे फाटा येथील रस्त्याचे काम अखेर सुरू झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे काम सुरू झाले आहे. मुळशी तालुक्यातून पुणे – दिघी बंदर राष्ट्रीय महामार्ग 753 हा जातो. या रस्त्याच्या कामासाठी 600 कोटी पेक्षा जास्त निधी मिळाला होता. चार वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. परंतु,लवळे फाटा ते पिरंगुट घाट आणि कासारआंबोली ते सुतारवाडीदरम्यानचे काम गेली सहा महिने बंद ठेवण्यात आले होते. याचदरम्यान अनेक अपघात घडून अनेकांना जीव गमवावा लागला.
चांदणी चौक ते ताम्हिणी घाटदरम्यान रस्त्याचे काम अनेक ठिकाणी झाले आहे. घोटावडे फाटा – पिरंगुट – लवळे फाटा येथे रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे परिसरातील व्यापार्यांना धुळीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या कामाबाबत विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांनी वेळोवेळी जिल्ह्याधिकारी तसेच तहसीलदार यांना निवेदन दिले. परंतु, काम सुरू झाले नाही. त्यामुळे संघर्ष समितीने पिरंगुट ते पौड पायी मोर्चा काढून याचा निषेध नोंदविला. तसेच पौड येथे गेल्या मंगळवारी ध्वज आंदोलनही केले. तसेच पौड ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय अशी पदयात्रा काढण्याचा इशाराही देण्यात आला होता.
रस्त्याच्या कामासंदर्भात जनतेचा रेटा पाहून रस्ता करणार्या संबंधित कंपनीने गेली, दोन दिवसांपासून लवळे फाटाकडून पिरंगुट घाटाकडे रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. आठवडाभरात लवळे फाटा ते पिरंगुट घाटरस्ता हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर कासारआंबोली ते सुतारवाडी रस्त्याच्या कामाला सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली.
पुणे – दिघी बंदर रस्त्याच्या रखडलेल्या कामाचा निषेध म्हणून मुळशी संघर्ष समितीने पौड तहसीलदार कार्यालय ते पुणे येथील जिल्ह्याधिकारी कार्यालयापर्यंत दि. 19 रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे. हा मोर्चा दि. 19 रोजी सकाळी सहा वाजता पौड तहसीलदार कार्यालयापासून निघणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.