पुणे: पाण्याच्या दुर्भिक्षासह उन्हाच्या चटका चांगलाच वाढल्याने त्याचा परिणाम फळभाज्यांच्या उत्पादनावर झाला आहे. उत्पादनाअभावी राज्यासह परराज्यातून या फळभाज्यांची आवक रोडावली आहे. आवकच्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे ढोबळी मिरची, गाजर आणि मटारच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
तर मागणी अभावी हिरवी मिरची, घेवडा व तोतापुरीच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. मागणी आणि पुरवठ्यातील समतोलामुळे उर्वरित फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली. गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी (दि. 27) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत ही आवक स्थिर राहिली.
परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, गुजरात आणि उत्तरप्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 18 ते 20 टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी 3 ते 4 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 2 ते 3 टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून घेवडा 2 ते 3 टेम्पो, कर्नाटक येथून 2 टेम्पो भुईमुग शेंग, हिमाचल प्रदेश 4 ते 5 टेम्पो मटार, कर्नाटक येथून पावटा 3 टेम्पो, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून कैरी 5 ते 6 टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसूणाची सुमारे 10 ते 12 टेम्पो तर इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 30 टेम्पो इतकी आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 500 ते 600 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 4 ते 5 टेम्पो, टोमॅटो 8 ते 10 हजार क्रेट, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, काकडी 5 ते 6 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 7 ते 8 टेम्पो, शेवगा 2 ते 3 टेम्पो, गाजर 5 ते 6 टेम्पो, भुईमूग शेंग 50 ते 60 गोणी, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा सुमार 75 ते 80 टेम्पो इतकी आवक झाली होती.
पालेभाज्यांची आवक वाढली
मार्केट यार्डात पालेभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत वाढली आहे. त्यामुळे मेथीच्या भावात घाऊक बाजारात जुडीमागे 2 रुपये, तर अंबाडीच्या भावात 1 रुपयांनी घट झाली आहे. तर आवकच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने शेपूच्या भावात जुडीमागे 2 रुपये आणि कांदापात, चाकवतच्या भावात प्रत्येकी 1 रुपयांनी वाढ झाली आहे.
मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित पालेभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापारी निखिल भुजबळ यांनी दिली. येथील घाऊक बाजारात रविवारी (दि. 27) कोथिंबिरीची सुमारे सव्वा लाख जुडींची आवक झाली. ही आवक मागील आठवड्यात 70 हजार जुडी होती. तर मेथीची मागील आठवड्यात 40 हजार जुडी आवक झाली होती. त्यामध्ये वाढ होऊन आज 60 हजार जुडींची आवक नोंदविण्यात आली. सध्या सर्व प्रकरच्या पालेभाज्यांना चांगली मागणी असल्याचे व्यापार्यांनी सांगितले.