वाल्हे; पुढारी वृत्तसेवा: यावर्षी उशिरापर्यंत झालेल्या पावसामुळे वापसा लवकर न आल्यामुळे रब्बी हंगामातील ज्वारीची पेरणी दरवर्षीपेक्षा वाल्हे (ता. पुरंदर) परिसरामध्ये कमी प्रमाणात झालेली आहे. ऑक्टोबर महिन्यात सततचा पाऊस, जमिनीतील ओलावा या नैसर्गिक अडचणीमुळे वाल्हे व परिसरात काही शेतकर्यांच्या रब्बी पेरण्या खोळंबल्या आहेत.
यावर्षी वाल्हे व परिसरात मान्सूनपूर्व पावसाची स्थिती अत्यल्प होती. मान्सून काळात पावसाची रिमझिम होत असल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली होती. दरम्यान, परतीच्या पावसाने अतिवृष्टीने खरीप हंगामातील अनेक पिके नष्ट झाली. यादरम्यान परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीने ओढे, नाल्यांना पूर आले. याचा परिणाम शेतीवरदेखील पडला आहे.
सततच्या पावसामुळे आता रब्बीच्या पेरण्या लांबणीवर पडल्याचे चित्र आहे. परतीचा पाऊस अधिक काळ सुरू असल्याने बगायती पट्ट्यात लवकर वापसा येणार नसल्याने रब्बी हंगामातील पेरणीस उशीर होत असल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. यावर्षी रब्बीची पेरणीला सुमारे एक महिना उशीर झाला असून अतिवृष्टीमुळे शेतीचे नियोजन कोलमडले आहे.
अस्मानी संकटाचा फटका
दरवर्षी सर्वसाधारणपणे ऑक्टोबर महिन्यात पेरण्या आटोपतात. मात्र, यावर्षी अस्मानी संकटामुळे पेरण्यांना उशीर झाला आहे. परिणामी, आता नोव्हेंबरच्या अखेरीस रब्बी हंगामातील पेरण्या पूर्ण होतील, अशी माहिती कृषी सहायक गीता पवार आणि मयूरी नेवसे यांनी दिली.
रब्बी हंगामातील साधारणपणे पीक पेरणी कालावधी
पीक पेरणी कालावधी
ज्वारी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर
हरभरा 1 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर
गहू नोव्हेंबर ते 15 डिसेंबर अखेर
रब्बी कांदा नोव्हेंबर ते डिसेंबरअखेर
वाल्हे परिसरातील अंदाजित रब्बीतील पेरणी अहवाल
पीक हेक्टर
ज्वारी 290 हेक्टर
हरभरा 25 हेक्टर
ऊस 10 हेक्टर
मूग 25 हेक्टर
कांदा 15 हेक्टर