पुणे : भारतात महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग म्हणजे स्तनाचा कर्करोग आहे. स्तनांच्या कर्करोगाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. उशिरा लग्न आणि उशिरा गर्भधारणा ही या वाढत्या धोक्याची महत्त्वाची कारणे ठरत आहेत. उशिरा लग्न, उशिरा गर्भधारणा आणि स्तनपानाचा अभाव या सर्वांमुळे हार्मोन्स सतत बदलत राहतात. त्यामुळे स्तनाच्या पेशींमध्ये ट्यूमर निर्माण होण्याची शक्यता वाढते.
स्तनाच्या कर्करोगाच्या निर्मितीत हार्मोन्स - विशेषतः इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन यांचा मोठा वाटा असतो. पूर्वी हा कर्करोग प्रामुख्याने 60 वर्षांवरील महिलांमध्ये आढळायचा. मात्र, आता 20 ते 30 वर्षे वयोगटातील तरुण महिलांमध्येही तो वाढताना दिसत आहे. शहरीकरण, करिअर केंद्रीत जीवनशैली, अनियमित झोप, चुकीचा आहार आणि ताणतणाव हे घटक हार्मोनल असंतुलनाला अधिक चालना देतात, असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनुपमा माने सांगतात. आधुनिक जीवनशैलीत स्त्रियांना करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल राखण्याचा मोठा दबाव जाणवतो. यामुळे गर्भधारणा पुढे ढकलली जाते आणि शरीरातील नैसर्गिक हार्मोनल संतुलन बिघडते. तसेच, शारीरिक हालचालींचा अभाव आणि वाढता लठ्ठपणा याही बाबी जोखमीच्या ठरतात.
नियमित स्व-परीक्षण : दर महिन्याला स्तन तपासणी करावी. गाठ, सूज, त्वचेतील बदल, स्त्राव इ. लक्षणे तपासा
मॅमोग्राफी/वैद्यकीय तपासणी : वय 40 नंतर वर्षातून एकदा मॅमोग्राफी. कौटुंबिक इतिहास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन लवकर तपासणी सुरू करावी.
संतुलित आहार : फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, कडधान्ये आहारात समाविष्ट करा. चरबीयुक्त, प्रक्रिया केलेले आणि तळलेले पदार्थ कमी करा.
योग्य वजन राखणे : स्थूलता (लठ्ठपणा) स्तन कर्करोगाचा धोका वाढवते. नियमित व्यायाम करा. (दररोज किमान 30 मिनिटे)
ताण-तणाव नियोजन : योग, ध्यान, रिलॅक्सेशन तंत्र वापरा, पुरेशी झोप घ्या.
नैसर्गिक स्तनपान (तसे शक्य असल्यास) : बाळाला स्तनपान दिल्याने आईचा स्तन कर्करोगाचा धोका कमी होतो.
हार्मोनल औषधे वापरताना काळजी : दीर्घकाळ थेरपी घेत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
कौटुंबिक इतिहासाची माहिती द्या : आई, बहीण, आजी इत्यादींना स्तनाचा कर्करोग असल्यास डॉक्टरांना कळवा. आवश्यक असल्यास जीन टेस्ट (1/2) करावी.
छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका : गाठ जाणवली, तर ‘थांबून पाहू’ नका, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.