पुणे

पुणे पोलिसांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त; पिस्तुल तस्करीचे मध्यप्रदेश कनेक्शन उघड

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला असून पिस्तुल तस्करी करणार्‍या दोन मुख्य डिलरसह सात जणांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून 17 पिस्तुले, 13 जिवंत काडतुसे तसेच एक महिंद्रा कार, मोबाईल फोन असा तब्बल 24 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही पिस्तुले मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात आणल्याने पुन्हा एकदा पिस्तुल तस्करीचे मध्यप्रदेश कनेक्शन उघड केले आहे. ही कामगिरी गुन्हे शाखेच्या युनिट 6 आणि युनिट 1 ने संयुक्तिकरित्या केली.

याप्रकरणी हनुमंत अशोक गोल्हार (वय- 24), प्रदीप विष्णू गायकवाड (वय -25 मूळ रा. बीड), शुभम विश्वनाथ गर्जे (25), अरविंद श्रीराम पोटफोडे (38), ऋषिकेश सुधाकर वाघ ( 25), अमोल भाऊसाहेब शिंदे (25, सर्व रा. अहमदनगर) आणि साहिल तुळशीराम चांदेरे उर्फ आतंक (21, रा. वरची आळी, सुसगाव, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

गुन्हे शाखा युनिट 6 चे पथक पेट्रोलिंग करत असताना, 25 फेब्रुवारी रोजी पोलिस पथकास पिस्टल विक्री करणारे दोन डीलर वाघोली परिसरातील नानाश्री लॉज याठिकाणी आल्याची माहिती मिळाली होती. त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या पथकाने सापळा रचून, आरोपी हनुमंत गोल्हार, प्रदीप गायकवाड यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून गावठी बनवटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे सापडली. ही पिस्तुले त्यांनी विक्रीकरीता आणली होती.

तपासात गोल्हार हा नवी मुंबई येथील दोन कोटी 80 लाख रुपयांच्या दरोडा घातल्या प्रकरणात फरार असल्याचे समोर आले आहे. गोल्हार याच्याकडून पिस्तुल विकत घेणारे पोटफोडे, गर्जे , वाघ, शिंदे यांना अटक केली. त्याच्याकडून 13 गावठी बनवटीचे पिस्तुले, चार जिवंत काडतुसे असा कारसह एकूण 21 लाख 32 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चार पिस्टल एकाकडून जप्त
गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे पथक पेट्रोलिंग करत असताना, बारणे रोड सिंचन भवन समोर एक संशयितरित्या व्यक्ती मिळून आला. त्यानुसार पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव साहिल तुळशीराम चांदोरे (वय – 21, रा.सुसगाव, पुणे) असे सांगितले त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या जवळील बॅगमध्ये 60 हजार रुपये किमतीचे देशी बनवटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. त्यांच्याकडून चार पिस्तुले व नऊ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

पोलिस आयुक्त रितेशकुमार, पोलीस सह आयुक्त,संदीप कर्णिक ,अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे अमोल झेंडे,सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे – एक सुनिल पवार,सहा. पोलीस आयुक्त गुन्हे- दोन नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट सहाचे रजनिश निर्मल वरीष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 1 संदीप भोसले पोलीस सहा पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस उप-निरीक्षक अजय जाधव, सुनिल कुलकर्णी उप-निरीक्षक सुरेश जायभाय, भैरवनाथ शेळके, अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठठल खेडकर, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे प्रतिक लाहीगुडे, नितीन मुंडे, मोहीते, ऋषिकेश ताकवणे, अश्पाक मुलाणी, ज्योती काळे, अमोल पवार, इम्रान शेख, आण्णा माने अय्याज दडीकर, महेश धामगुडे, विठ्ठल साखे, निलेश साबळे, शुभम देसाई, दत्ता सोनवणे यांनी केली.

ही पिस्तुले मध्यप्रदेशात तस्करी करून ती पुण्यात 30 ते 50 हजारांना विकल्याचे निष्पन्न झाले आहे. या टोळक्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करता येईल का ? त्या दृष्टीनेही आमचा विचार सुरू आहे.

                            – रामनाथ पोकळे, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT