राहुल हातोले :
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला लागून असलेल्या पुणे-बंगळुरू, पुणे-मुंबई, पुणे-नाशिक या तीनही महामार्गावर लेन कटिंग करणार्या वाहनांची संख्या अधिक आहे. लेन कटिंगमुळे वाढत्या अपघातांची संख्या पाहता आरटीओने कारवाईचा धडाका सुरू केला असून, गेल्या पाच महिन्यांत लेन कटिंग करणार्या 1803 वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमधून आरटीओच्या तिजोरीत 9 लाखांहून अधिक दंडाची रक्कम जमा झाली आहे.
महामार्गावर गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात अपघातांमध्ये वाढ झालेली आहे. यामध्ये लेन कटिंग केल्याने अपघाताच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी लेन कटिंग करणार्या वाहने काही ठिकाणी कॅमेरामध्ये कैद होत आहेत. तर काही वाहनांवर आरटीओच्या स्कॉडने जागेवर कारवाई केलेली आहे. यामध्ये डिसेंबर 438, जानेवारी 377, फेब्रुवार 427, मार्च 314, एप्रिल 247 वाहनांवर मोशी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे.
मग सज्ज व्हा 500 रुपये दंड भरायला
महामार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. यामध्ये ही वाहने मोठ्या प्रमाणात लेन कटींग करत असतात परिणामी इतर वाहन चालकांना पुढील वाहनाचा अंदाज न आल्याने जीवघेणा अपघात घडू शकतो. त्यामुळे आता लेन कटींग करणार्या अवजड वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात येत आहे. गेल्या चार महिन्यांत फेब्रुवारीमध्ये मोठी कारवाई झाली आहे. 500 रुपये दंडानुसार 2 लाख 13 हजार पाचशे रुपयांचा दंड वाहनचालकांकडून आकारण्यात आला आहे.
महामार्गावरील अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या अपघातांना आळा घालण्यासाठी मोशी उपप्रादेशिक विभागाच्या वतीने मोहीम राबविण्यात येत आहे. लेन कटिंगमुळे मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे हे प्रत्येक वाहनचालकाने टाळावे आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा वाहन चालकांना दंड भरावा लागणार आहे.
– मनोज ओतारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड.