पुणे

शेतजमीन हडप करणारे सावकार अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गजाआड

अमृता चौगुले

पौड : पुढारी वृत्तसेवा : मुळशी खुर्द (ता. मुळशी) येथे शेतजमीन मिळकत परस्पर खरेदीखत करून बळकविल्याप्रकरणी पौड पोलिस स्टेशनमध्ये चार जणांवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट व सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आलेली असून, एक जण फरार झाला आहे. पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळशी खुर्द येथील शेतकरी किसन बाळू ऊर्फ बाबूराव कांबळे यांच्या मालकीहक्काची मुळशी खुर्द येथील शेतजमीन 35.40 गुंठे मिळकत परस्पर खरेदीखत करून येथील सावकार सुहास बाळू कानगुडे, बाळू धोंडू कानगुडे, चिंतामण दत्तू ढमाले, सुधीर बाळू कानगुडे (सर्व रा. मुळशी खुर्द, ता. मुळशी) यांनी बळकावली होती. त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट व सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला असून, तीन आरोपींना अटक केली आहे, तर चिंतामण दत्तू ढमाले हा आरोपी फरार झाला आहे.

या गुन्ह्यातील फिर्यादी किसन बाबू कांबळे यांच्या मालकीची शेतजमीन सावकार सुहास बाळू कानगुडे व इतर यांनी सावकारकीमधून व्याजाच्या रकमेपोटी बळकावली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या रिपब्लिकन श्रमिक बि—गेड संघटनेच्या वतीने पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश केदारी यांनी निवेदनाद्वारे दिला होता. याची दखल घेत तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन आरोपींना अटकही करण्यात आली.
गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले-पाटील हे करीत असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक भालचंद्र शिंदे, बीट अंमलदार सचिन शिंदे, पोलिस नाईक सचिन सलगर, ईश्वर काळे, नामदेव मोरे, पोलिस पाटील आकाश कांबळे यांनी आरोपींना बेड्या ठोकल्या.

SCROLL FOR NEXT