पुणे: जागेच्या वादातून तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार कात्रज येथील संतोषनगरमध्ये घडला. सराईतांविरुद्ध आंबेगाव पोलिसांनी गु्न्हा दाखल केला असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शुभम सुभाष चव्हाण असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सराईत गुन्हेगार अमर साकोरे याच्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम आणि आरोपी अमर यांच्यात एका जागेवरून वाद होता. शुभम पहाटे कात्रजमधील संतोषनगर भागातून निघाला होता. त्या वेळी आरोपी अमर आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी त्याला अडविले. आरोपींनी त्याला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली.
आरोपींच्या तावडीतून वाचण्यासाठी शुभम तेथून पळाला. आरोपींनी त्याचा पाठलाग केला. त्याला बांबूने बेदम मारहाण केली. त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. या घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेले आरोपी अमर साकोरे आणि त्याच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक
शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे. आंबेगाव पोलिस ठाण्याच्या पथकाने खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या चार आरोपींना सोलापूर जिल्ह्यातील कामठी बु. (ता. मोहो येथून ताब्यात घेतले आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये अमर दिलीप साकोरे (वय 40, रा. संतोष नगर, कात्रज), मंदार मारुती किवळे (वय 35, रा. कात्रज गाव नवीन वसाहत), गिरीश सुभाष बाबरे (वय 25, रा. कात्रज गाव) आणि योगेश बाबुराव ढोरे (वय 35, रा. खोपडे नगर, गुजरवाडी, कात्रज) यांचा समावेश आहे. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कामठी बु. येथे छापा टाकत ही कारवाई केली. आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल असून, त्यांच्या विरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांनी दिली आहे.